पाणीपुरवठा योजना अपूर्णच; जलयुक्त शिवारांतर्गत विहिरी नूतनीकरणावर करोडोंचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 02:38 AM2018-04-17T02:38:58+5:302018-04-17T02:38:58+5:30
मार्च महिन्यापासून तहाणलेल्या विक्रमगडमध्ये मे महिन्यापर्यंन खडखडाट होतो. तालुक्यातील काही गावपाड्यांमध्ये चाळीस ते पन्नास दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. नदी-नाले आटू लागले असून विहीरींनीही तळ गाठला आहे.
तलवाडा : मार्च महिन्यापासून तहाणलेल्या विक्रमगडमध्ये मे महिन्यापर्यंन खडखडाट होतो. तालुक्यातील काही गावपाड्यांमध्ये चाळीस ते पन्नास दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. नदी-नाले आटू लागले असून विहीरींनीही तळ गाठला आहे. दरम्यान, दरवर्षीच्या या रडगाण्यावर गत तेरा वर्षांपासून सुरु असलेली पाणी पुरवठा योजनांची मलमपट्टी अपुर्ण अवस्थेमध्ये असल्याने दोषी अधिकारी व ठेकेदाराचीं चौकशीची मागणी होत आहे.
तालुक्यातील १० ग्राम पंचायतींसाठी राबविण्यात आलेल्या नळपाणी योजना अर्धवट अवस्थेमध्ये असून त्यातील ६ योजना १३ वर्षा पासून तर ४ योजना ६ वर्षा पासून रखडलेल्या असल्याने या योजनाच्या कामात गैर प्रकार झाल्याची शक्यता निर्माण झाली आहे. या योजनाच्या अपूर्ण अवस्थेबाबत जिल्हा परीषद प्रशासनाकडे अनेक वेळा नागरिकांनी तक्र ारी करून ही जिल्हा परीषद पाणी पुरवठा विभाग प्रत्यक्ष कुठल्याच प्रकारची चौकशी करत नसल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे. या योजनान साठी तब्बल १ कोटी ९७ लाख ५९ हजार रु खर्च झाला आहे. तालुक्यातील २००४-५ साला पासून पाणी पुरवठा योजनांना साठी देहर्जे गावातील योजनेसाठी १५.८५ लाख निधी मंजूर होता पैकी १२.६० लाख वितरीत करण्यात आला. साखरेसाठी २२.९९ लाख निधी मंजूर होता त्यापैकी १७.७३ लाख वितरीत करण्यात आला. केव (शीलशेत) गावसाठी २१.६१ लाख निधी मंजूर होता. पैकी ८.६१ लाख निधी वितरीत करण्यात आला. या योजनात अपहार झाल्याने या योजना न्याय प्रविष्ठ असल्याने गेल्या १३ वर्षांपासून रखडल्या आहेत. २००५-६ साली दादाडे (कमळ पाडा) गावासाठी २३.०४ लाख निधी मंजूर होता. पैकी ८.६२ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे. जांभा- पोचाडा गावासाठी १०.५१ लाख निधी मंजूर होता. पैकी ६.६१ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे.
टेटवालीसाठी ३४.२४ लाख
टेटवाली (बागपाडा) गावासाठी ३४.२४ लाख निधी मंजूर होता. त्यापैकी २९.२७ लाख निधी वितरीत करण्यात आला. उपराले गावासाठी ४५.४४ लाख निधी मंजूर होता. त्या पैकी ३८.८५ लाख निधी वितरीत करण्यात आला. उटावली- पोटखल साठी ४४.९९ लाख निधी मंजूर होता. पैकी २५.६४ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे.
तालुक्यातील रखडलेल्या योजना पुर्ण करण्याचे आदेश आम्ही संबधिताना दिले आहेत. या योजना पुर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. जलयुक्त शिवार योजने अंतर्गत तालुक्यातील अनेक विहीरी नुतनिकरणची कामे सुरु आहे.
- एस.बी.कदम, प्रभारी अभियंता,
पाणी पुरवठा विभाग, पं. स. विक्रमगड