विक्रमगड तालुक्यात पाणीबाणी, टँकरची मागणी वाढली, सध्या एका टँकरद्वारे होतात चार फेऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:35 AM2019-05-14T00:35:44+5:302019-05-14T00:35:58+5:30
सुमारे १ लाख १४ हजार लोकसंख्या असलेल्या या तालुक्याची पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करीत आहे.
विक्रमगड : सुमारे १ लाख १४ हजार लोकसंख्या असलेल्या या तालुक्याची पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करीत आहे़. तालुक्यात दरवर्षी ३४ ते ३५ गावपाडयांना पाणीटंचाईची झळ बसत असते़ व टॅकरने पाणीपुरठा करावा लागतो़
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहील्याने फेब्रुवारी पासूनच येथे पाणी टंचाई सुरु झाली आहे, ती आता मे मध्ये पराकोटीला पोहचली आहे. जोपर्यत चांगला पाउस होत नाही तोपर्यत पाणी टंचाईचा सामना करावाच लागणार आहे़ गेल्या दोन वर्षापासून विक्रमगड तालुक्यातही पावसाचे प्रमाण कमी झाले आहे़ त्यामुळे नदी, नाले, विहीरी आटून विविध गाव पाडयांत पाणीटंचाई सुरु झाली आहे़ सध्या शासनाच्या आठवडा अहवालानुसार खुडेद, घोडीचापाडा, कुंडाचापाडा, झापपाडा, कोंडगाव, गावठाण, सवादे, फडवळेपाडा अशा गावपाडयांना १ टँकरने दिवसाला ४ फे-या मारुन पाणी पुरवठा केला जात आहे़
तर अनेक गाव पाडयांचे टँकरचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यांत आलेले आहेत़ सध्या पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता तिन ते चार टँकरची आवश्यकता असून तसा प्रस्ताव पाठविण्यांत आलेला आहे़
तालुक्यात गावपाडयातील विविध जलस्त्रोत पूर्ण आटले असून सध्या वेहेलपाडा, देहेर्जे, साखरे, खुडेद, घाणेघर, सुकसाळे, टेटवाली, जांभे, केव, तलवाडा, दादडे या महसुली गावांसह काचरपाडा, फरलेपाडा, मेढीचापाडा, पाटीलपाडा, महालेपाडा, सुरुमपाडा, काकडपाडा, गांगडपाडा नाळशेत, शिळशेत-तरेपाडा-वेडगेपाडा, शनवारपाडा, रोजपाडा आदी ठिकाणी लोकांना पाण्यासाठी नदीचा आसरा घ्यावा लागत आहे़. तसेच डोंगरी पाडयावर देखील अशीच परिस्थिती असून गेल्या १० ते २० दिवसांपासून येथील महिलांना पाण्यासाठी रखरखत्या उन्हांत वणवण भटकंती करावी लागते आहे़.
विक्रमगड तालुक्यात या भागत तर दरवर्षी पाणी टंचाईची झळ बसत असतांनाही प्रशासन मात्र कोणत्याही प्रकारची हालचल करतांना दिसत नाही़ त्यामुळे येथील महिलांना पाण्यासाठी पहाटे उठून लांबचा पल्ला असो तरीही ही पायपीट करावीच लागते़ यामुळे महिलांना त्रास सहन करावा लागत असल्याची खंत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्याबाबतही वर्षानुवर्षे काहीही कारवाई होत नाही.
टंचाई निवारणाबाबत जिल्हा प्रशासन पुरेसे गंभीर नाही
प्रशासनाने जानेवारी महिन्यापासूनच संभाव्य यावर मात करण्याकरीता टंचाई निवारण आराखडा तयार करुन ती निर्माणच होऊ नये यासाठी याकरीता गंभीर पावले उचलावयास हवी जेणे करुन टंचाईग्रस्त भागाचा वाढत जाणार भार कमी होईल़ फेब्रुवारी महिन्यातच आटत चालेल्या विहीरींमध्ये टँकरने पाणी ओतले पाहीजे़ अशी भूमीका अगोदरच पासून ठेवल्यास पाणी टंचाई होणार नाही.