६४ लाख खच्चूनही डबक्यातलेच पाणी
By admin | Published: March 12, 2017 02:12 AM2017-03-12T02:12:06+5:302017-03-12T02:12:06+5:30
तालुक्यातील कोने-दुपारेपाडा ग्रामपंचायतीत जलस्वराज्य योजने अंतर्गत नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आली. त्यासाठी ६४ लाख निधी खर्च करण्यात आला
- वसंत भोईर, वाडा
तालुक्यातील कोने-दुपारेपाडा ग्रामपंचायतीत जलस्वराज्य योजने अंतर्गत नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आली. त्यासाठी ६४ लाख निधी खर्च करण्यात आला असला तरी, आजही येथील गामस्थांना डबक्यातील अशुद्ध पाणी प्यावे लागत असल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.
कोने - दुपारेपाडा ग्रामपंचायतीतील विजयपूर, शिरिषपाडा, जांभूळपाडा व हरणेपाडा या तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावातील व पाडयांसाठी २००८ साली सुमारे ६४ लाख रु पये खर्च करून नळपाणी योजना राबविण्यात आली. त्यावेळी आहळाकिनारी विहीर बांधली व पाण्याचा साठा करण्यासाठी पाण्याची टाकी बांधण्यात आली. काही भागात पाईपही टाकण्यात आले मात्र एवढे करूनही नळपाणी योजना आज पर्यंत पूर्ण होऊ शकली नाही की, नागरिकांना पाणी मिळू शकले नाही. त्यामुळे येथील गावातील लोकांच्या नशिबी आजही डबक्यातील अशुद्ध पाणीच आहे.
योजना पूर्ण होऊन नऊ वर्षे झाली तरी पाणी न आल्याने नागरिकांचा भ्रमनिरास झाला. बांधलेली विहीर आता गाळाने भरली आहे. तर पाण्याची टाकी कमकुवत झाली असून ती कधी पडेल याचा नेम नाही. काही भागात पाईप लाईन टाकण्यात आली होती. मात्र, अनेक वर्षानंतरही पाणी येत नसल्यामुळे पाईप चोरीला गेले आहेत. पाणी नसल्यामुळे बैलगाडी किंवा वाहनातून पाणी आणावे लागते. गावातील एक व्यक्ती पाणी विकत असल्याने बाकी सर्व पाणी विकत घेत आहेत आहेत असे नागरिकांनी सांगितले. या योजनेची तातडीने पाहणी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जितेंद्र गायकवाड या ग्रामस्थाने केली आहे. माहिती न मिळाल्याने राज्य माहिती आयोगाकडे अपिल दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, तालुक्यातील अनेक गावांत राबविलेल्या पाणी योजनांचा बोजवारा उडाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
या संदर्भात ग्रामसेवक संजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ही योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिलेली नाही. तत्कालीन ग्रामसेवकाच्या कालावधीत ही योजना राबविण्यात आली होती.
त्या बाबतचे कागदपत्रे दप्तरी उपलब्ध नाही. पाण्यापासून नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून विजयपूर येथे कूपनलिका खोदणार आहोत. तर कोने जांभूळपाडा येथील कूपनलिकांतील पाणी पुरवठा सुरळीत सुरु आहे अशी, माहिती त्यांनी दिली.