दाभोण सागदेवपाड्यात पाणीबाणी
By admin | Published: March 21, 2017 01:38 AM2017-03-21T01:38:00+5:302017-03-21T01:38:00+5:30
डहाणू तालुक्यातील दाभोण सागदेवपाड्यात तीव्र बाणीबाणी निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे.
अनिरुध्द पाटील / बोर्डी
डहाणू तालुक्यातील दाभोण सागदेवपाड्यात तीव्र बाणीबाणी निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. येथील दाभोण, रणकोळ, ऐना,साये ,निकणे या गावचे ग्रामस्थ डोंगरदऱ्यांमध्ये पाण्याचा शोध घेत फिरत असल्याचे विदारक चित्र आहे. मात्र स्थानिक प्रशासन या जीवघेण्या समस्येबाबत अनिभज्ञ असल्याचे दिसते.
तालुक्यातील या भागातील नद्या पावसाळ्यात दुथडी भरुन वाहतात मात्र उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. तालुक्यातील अनेक गावे आणि वाड्यांचे विदारक चित्र दाखवणारे दाभोणचा सागदेवपाडा हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. या पाड्याकरिता बांधण्यात आलेल्या विहिरिचे पाणी दूषित झाल्याने डबक्यातून पाणी भरण्याची वेळ नागरिकांवर ओढवली आहे. येथे शासनाने पाणीपुरवठयाची नळपाणी योजनाच राबावलेली नसल्याने नळाचे पाणी म्हणजे काय? ते कसे व कोठून येते हे गावकऱ्यांना ठाऊक नाही. त्यामुळे डोंगरकपारितील अवघड पाऊल वाटेवरून थेंब थेंब पाण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरु झाला आहे. याची जाणीव स्थानिक लोकप्रतिनिधी वा अधिकाऱ्यांना नाही. टंचाई निवारणासाठी शासन दरवर्षी करोडो रूपयांचा निधी खर्च करीत असली तरी नियोजना अभावी गरज असलेली गावं लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे मानवाधिकारी संस्था तसेच सोशल ग्रुपच्या माध्यमातून सर्वेक्षण करून जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन योजना कार्यान्वित करण्याची मागणी केली जात आहे.