जव्हार रुग्णालयात पाणीबाणी
By admin | Published: May 22, 2016 01:23 AM2016-05-22T01:23:08+5:302016-05-22T01:23:08+5:30
‘कोणी प्यायला पाणी देता का पाणी’ म्हणत दारोदार पाण्याची भिक्षा मागण्याचा दुर्देवी प्रसंग सध्या जव्हार ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांवर ओढवला आहे.
हुसेन मेमन, जव्हार
‘कोणी प्यायला पाणी देता का पाणी’ म्हणत दारोदार पाण्याची भिक्षा मागण्याचा दुर्देवी प्रसंग सध्या जव्हार ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांवर ओढवला आहे. ग्रामीण रुग्णालयात पाण्याचा थेंब नसल्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्यासाठी दारोदार फिरावे लागत आहेच परंतु अतिशय संतापाची बाब म्हणजे जे उपचारासाठी दाखल आहेत त्या रुग्ण महिलांना स्वत:च्या आजारपणाची पर्वा न करता घोटभर पाण्यासाठी भर उन्हात वणवण करावी लागते आहे .
पाणीटंचाईच्या काळात नगरपरिषदेकडून शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो शिवाय आठवड्यातील दोन दिवस पाणी पुरवठा बंद असतो. तालुक्यातील १ लाख ७२ हजार लोकसंख्येसाठी असलेल्या शासकीय व सुसज्य अशा एकमेव ग्रामीण रुग्णालयासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना नसल्यामुळे तेथे उपचारासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील आदिवासी रुग्णांना, त्यांच्या देखभालीसाठी आलेल्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरश: दारोदार फिरण्याची वेळ आली आहे. हॉस्पिटलच्या परिसरातील रहिवाशांनाच पाणी मिळत नाही तर ते रुग्णांना किंवा त्यांच्या आप्तांना कुठून देणार?
जव्हार ग्रामीण रुग्णालयात दररोज सरासरी ३५० रुग्ण तपासणी साठी येतात, त्यातील बराचशा रु ग्णावर भरती करून उपचार करण्याची आवश्यकता असते. परंतु अगोदरच क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण भरती असल्यामुळे अनेकांना ८० कि.मी.दूर असलेल्या नाशिक, ठाणे येथील जिल्हा रुग्णालयात हलवावे लागते. अशा प्रतिकूल परिस्थतीत रुग्णसेवा करीत असले तरी पाणी नाही, लाईट नाही हे वास्तव उरतेच. ही सेवा सुरळीत ठेवण्याचे काम पालिका प्रशासनाचे आहे याचा विचार न करता खापर मात्र हॉस्पिटल प्रशासनावरच फोडले जाते. रुग्णालयात पाण्याची भीषण पाणी टंचाई असताना जव्हार नगरपरिषद त्यांना दिवसाला पाण्याचे दोन छोटे टँकर देते. हे ४००० लिटर्स पाणी तपासणीसाठी आलेले रु ग्ण , भरती असलेले रुग्ण व त्यांचा सोबत आलेले नातेवाईक, कर्मचारी निवासस्थाने यांना पिण्यासाठी तसेच प्राथमिक गरजांसाठी पाणी पुरत नाही.