सामोपचाराने मार्ग काढणार ! समुद्र हद्दीचा ३० वर्षांपासूनचा वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 12:46 AM2020-01-21T00:46:19+5:302020-01-21T00:46:46+5:30
पालघर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून वसई - उत्तन - मढ विरुद्ध दमण - दातीवरे दरम्यानच्या मच्छीमारांमध्ये समुद्रातील हद्दीवरून धुमसत असलेल्या वादावर सामोपचारातून तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- हितेन नाईक
पालघर - जिल्ह्यात अनेक वर्षांपासून वसई - उत्तन - मढ विरुद्ध दमण - दातीवरे दरम्यानच्या मच्छीमारांमध्ये समुद्रातील हद्दीवरून धुमसत असलेल्या वादावर सामोपचारातून तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वादामुळे मत्स्यउत्पादनावर परिणाम झाला आहे. तसेच रोजी रोटीचा प्रश्नही निर्माण झाला आहे. याच्या निषेधार्थ २३ जानेवारी रोजी जिल्ह्यातील मच्छीमारांकडून समुद्रात ‘हकालपट्टी (भगाव) आंदोलन’ छेडण्यात येणार होते. मात्र, मढ - गोराई - वसई दरम्यानच्या मच्छीमारांनी चर्चेतून सामोपचाराचा मार्ग काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या वादावर एक सन्मानजन्य तोडगा निघण्याचा एक आशेचा किरण निर्माण झाला आहे.
पालघर - डहाणूविरुद्ध वसई, उत्तन येथील मच्छीमारांचा समुद्रातील अतिक्रमणाचा प्रश्न ३० वर्षांपासून धगधगता आहे. या ज्वलंत प्रश्नावर उपाययोजना आखण्यात केंद्र आणि राज्य शासनाकडून उदासीन धोरण स्वीकारले जात आहे. तर दुसरीकडे दोन्ही भागातील मच्छीमारांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरही कुठलाही निर्णय होत नसल्याने समुद्रातील कवीचे खुंट रोवण्याची अन्यायकारक प्रक्रिया सुरूच आहे.
मढ ते गोराई मच्छीमार संघर्ष समितीने १७ जानेवारी रोजी भाटी मच्छीमार सर्वोदय संस्थेच्या नवीन इमारत कार्यालयात आयोजित बैठकीत वसई आणि उत्तन भागातील सहकारी संस्थांतील सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत दमण ते दातीवरे भागातील मच्छीमारांनी वसई, उत्तन, मढ, भाटी भागातील मच्छीमारांनी कवी मारून अतिक्रमण केल्याच्या आरोपासह अन्य तीन विषय चर्चेला घेतले होते. या बैठकीत सर्व अंगाने चर्चा होत आपण सर्व मच्छीमार एक असून आपल्यामध्ये कटुता निर्माण होत संघर्षातून मारामाऱ्या, केसेस तसेच न्यायालयीन खटले दाखल करण्यापेक्षा दोन्ही बाजूच्या लोकांनी सामोपचाराने चर्चा करून यशस्वी तोडगा काढण्यावर एकमत झाल्याचे संघर्ष समिती अध्यक्ष कृष्णा कोळी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्यामुळे शासनाने दोन्ही बाजूच्या मच्छीमार प्रतिनिधींची बैठक लवकरात लवकर आयोजित करून अनेक वर्षांपासून एकमेकांत धुमसत असलेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी युद्धपातळीवर पावले उचलणे आता गरजेचे बनले आहे.
दरम्यान, समुद्रात कवीचे खुंट रोखण्याची ही प्रक्रिया रोखण्याच्या पालघर - डहाणू तालुक्यातील मच्छीमारांच्या मागणीकडे केंद्र तसेच राज्य शासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने न्यायालयाने ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले असूनही कवीचे खुंट मारणे सुरूच आहे. वसई - उत्तननंतर मढ आणि भाटी येथील मच्छीमारांनी नव्याने आपल्या कवी मारायला सुरुवात केल्याचे दमण ते दातीवरे मच्छीमार धंदा संरक्षण समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील सातपाटी, मुरबे, डहाणू, दमण आदी भागातील मच्छीमारांनी दोन कवींच्यामध्ये ठेवलेल्या सुरक्षित जागेतच या कवी मारल्या जात असल्याने जिल्ह्यातील परंपरागत पद्धतीने दालदा, वागरा इत्यादी पाण्याच्या प्रवाहसोबत मासेमारी करणाºया मच्छीमारांची जाळी त्या कवींच्या खुंटात अडकून सर्व जाळी अडकून फाटून निकामी होत आहेत. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांची मत्स्यउत्पादनाची आकडेवारी घसरू लागली आहे.
आपला दालदा, वागरा, मगरी, आदी पद्धतीची मासेमारी करणे दिवसेंदिवस अशक्य होत असून वसई, उत्तन, मढ-भाटी आदी भागातील एका मच्छीमारांच्या १० ते १५ कवी असल्याने हजारो बोटधारकांच्या लाखो कवी आज समुद्रात रोवल्या गेल्या आहेत. या अनेक भागात रोवलेल्या कवीच्या खुंटामुळे आम्हाला मासेमारीसाठी जाळी टाकण्यासाठी समुद्रात जागा शिल्लक रहात नसल्याच्या पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांच्या तक्रारी आहेत. प्रत्येक गावातील मच्छीमारांनी आपल्या गावासमोरच मासेमारी करावी हा अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या नियमाचे (लवादाचे) पालन प्रत्येक मच्छीमारांनी करावे अशी पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांची मागणी आहे. परंतु, मासेमारीच्या बदलत्या धोरणांचा लाभ उठवीत वसई, उत्तन मढ भागातील मच्छीमार थेट गुजरातच्या जाफराबादच्या समुद्रापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे गुजरात, दीव-दमण भागातील मच्छिमारही वैतागले असून त्यांचाही समुद्रात अमर्यादितपणे कवी मारण्याच्या पद्धतीला विरोध असल्याचे गुणवंत माच्छी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
यामुळे पालघर-डहाणू-दमण विरुद्ध वसई-उत्तन-मढ-भाटी असा वाद आता नव्याने सुरू झाला आहे. आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने मत्स्य उत्पादनात घट होत आमच्यापुढे निर्माण रोजी-रोटीच्या गंभीर प्रश्नावर उपाय म्हणून आमच्या भागात मासेमारी करण्यासाठी येणाºया वसई, उत्तन, मढ-भाटी येथील मच्छीमारांना मासेमारी करू न देता हाकलून लावण्यासाठी २३ जानेवारी रोजी होणाºया हकालपट्टी मोहिमेसाठी ३०० ते ४०० मच्छीमारांनी बोटी सज्ज करण्याचे काम हाती घेतले आहे.
चर्चेचा प्रस्ताव आल्यास त्याचे स्वागत करून हकालपट्टी मोहीम स्थगितीबाबत चर्चेतून ठरवू. जिल्हा सल्लागार समितीची बैठक लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना उद्या पत्र देणार आहोत.
- अशोक अंभिरे, अध्यक्ष,
दमण ते दातीवरे मच्छीमार धंदा संरक्षण समिती
मासेमारीसाठी समुद्रात मर्यादित जागा असून कवी मारण्याचे प्रमाण वाढल्याचे मान्य आहे. त्यामुळे कवींचे प्रमाण कमी करण्याबाबत एकत्र प्रयत्न करू. दोन्हीबाजूचे मच्छीमार एकमेकांच्या भागात येत असतात त्यामुळे संघर्ष निर्माण होण्यापेक्षा चर्चेतून मार्ग निघू शकतो.
- कृष्णा कोळी, अध्यक्ष,
मढ ते गोराई मच्छीमार संघर्ष समिती.