‘त्या’ रस्त्याच्या कामात दिरंगाई; विद्यार्थ्यांना करावी लागते पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 11:10 PM2020-02-01T23:10:16+5:302020-02-01T23:11:20+5:30
गोऱ्हे-गालतरे बससेवा महिन्यापासून बंद
वाडा : वाडा तालुक्यातील गोऱ्हे-गालतरे रस्त्याचे काम संथगतीने सुरू झाल्यामुळे बससेवा बंद झाली आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून दररोज चार ते पाच किलोमीटर पायी प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पालघर जिल्ह्यात थंडीची लाट असताना विद्यार्थ्यांना पहाटेच्या सुमारास लवकर उठून बसविना थंडीत पायपीट करावी लागत आहे.
तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीचा असणारा वाडा-गोऱ्हे-गालतरे रस्त्यावर गोऱ्हे येथे काँक्रिटीकरण कामाला एक महिना पूर्ण झाला असून संबंधित ठेकेदाराकडून दिरंगाई होताना दिसत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्याचे काम चालू असताना कुठेही फलक लावण्यात आले नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.
गोऱ्हे-गालतरे हा रस्ता चार ते पाच कि.मी. लांबीचा असून त्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून दहा कोटी निधी देण्यात आला आहे. संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम अर्धवट टाकलेले दिसत आहे. रस्त्याचे काम चालू असताना पर्यायी रस्ता अरुंद असल्याने बस व इतर वाहने येत नसल्याने विद्यार्थ्यांना तसेच येथील नागरिकांना पायपीट करून घरी परतावे लागते. याबाबतीत मुख्यमंत्री सडक योजनेतील शाखा अभियंता विनोद घोलप यांना विचारले असता कुठलीही बससेवा बंद नसून याबाबतीत माझ्यापर्यंत काहीही आलेले नाही. बससेवा बंद असेल तर ती सुरू करण्यासाठी व्यवस्था करण्यात येईल, असे सांगितले.
दरम्यान, रस्त्याचे काम चालू असल्यामुळे गावातून बस जात नाही. गावाच्या बाहेरून अरुंद रस्त्यावरून बस चालकाने बस फिरवण्यासाठी प्रयत्न करत असताना एका घराचा पत्रा तुटला. तो त्या वाहकाने भरून दिला. त्यामुळे रस्ता अरुंद असल्याने बससेवा बंद करण्यात आली आहे.
लवकरात लवकर काम पूर्ण करा
जिजाऊ कन्स्ट्रक्शनचे काम दर्जेदार असेल याची खात्री आहे, परंतु रस्त्याचे काम खूप संथ गतीने चालू असल्याकारणामुळे बससेवा गेल्या एक महिन्यापासून बंद आहेत. त्यामुळे शाळेतील मुलांचे हाल होत असून त्यांना प्रवासासाठी वणवण करून शाळेत जावे लागते. लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करून शाळेतील मुलांचा त्रास दूर करावा.
- डॉ. राहुल पाटील
नाणे-गोऱ्हे रस्त्याचे काम संथ गतीने चालू आहे, त्यामुळे शाळेतील मुलांना जाण्यासाठी खूप त्रास होतो. कारण एस.टी. सेवाही बंद करण्यात आली आहे. तसेच रस्त्याचे काम चालू असताना कुठेही फलक लावण्यात आले नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून जनतेला होणारा त्रास कमी करावा, अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी केली आहे.
- वैभव पाटील, नाणे