जीन्स पॅन्ट घालणे शिक्षकांना भोवले, गटविकास अधिकाऱ्यांकडून नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 12:00 AM2021-02-01T00:00:36+5:302021-02-01T00:01:24+5:30
Teacher News : पाच शाळांमधील शिक्षकांनी कार्यालयीन वेळेत जीन्स पॅन्ट घातल्यामुळे पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्यामार्फत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
विक्रमगड : पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना जीन्स पॅन्ट घालणे चांगलेच भोवले आहे. विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, गावितपाडा (केंद्र बास्ते), गुरवपाडा (केंद्र विक्रमगड), वनशेपाडा, बालापूर (पाटीलपाडा), सावरोली या पाच शाळांमधीलशिक्षकांनी कार्यालयीन वेळेत जीन्स पॅन्ट घातल्यामुळे पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्यामार्फत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
शासन परिपत्रकानुसार सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दैनंदिन पेहराव हा शासकीय कर्मचाऱ्यांना शोभनीय असावा. यामध्ये जीन्स पॅन्ट परिधान न करण्याविषयी शासन परिपत्रकामध्ये स्पष्ट केलेले असतानाही या पाच शाळांमधील शिक्षकांनी शालेय वेळेत जीन्स पॅन्ट परिधान केल्यामुळे विक्रमगड गटविकास अधिकाऱ्यांनी या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावत खुलासा मागवला आहे.