वसईत आता रविवारी होणार भारनियमन; आर्थिक नुकसान टळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 03:24 AM2019-12-01T03:24:47+5:302019-12-01T03:24:55+5:30
वसई तालुका हा औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखला जातो.
विरार : वसईतील औद्योगिक कंपन्यांमध्ये दर आठवड्याला शुक्र वारी होणारे भारनियमन आता रविवारी घेतले जाणार आहे. महावितरणने नुकताच हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने वसईतील असंख्य औद्योगिक कंपन्यांचे आर्थिक नुकसान टळणार असून त्यांना दिलासा मिळेल.
वसई तालुका हा औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखला जातो. येथे असंख्य मॅन्युफॅक्चरिंग व सेवा देणाऱ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये महावितरणाकडून दर आठवड्याला शुक्र वारी भारनियमन केले जाते. यामुळे कंपन्यांचे मोठे आर्थिक नुकसान व्हायचे. कंपन्यांतील कामगारांनाही भारनियमनामुळे शुक्र वारी सुट्टी घ्यावी लागायची व रविवारच्या सुटीपासून वंचित राहावे लागायचे. त्यामुळे कंपन्याचे भारनियमनामुळे नुकसान व्हायचे. दरम्यान, आता यावर महावितरणने औद्योगिक क्षेत्रातील भारनियमनाचा वारच बदलला आहे. त्यामुळे नव्या वारानुसार आता वसई तालुक्यातील औद्योगिक कंपन्यातील भारनियमनाचा वार हा रविवार असेल.
वसई तालुक्यातील औद्योगिक कंपन्यांमध्ये भारनियमन आता शुक्र वारी न घेता रविवारी होणार आहे. हे भारनियमन फक्त औद्योगिक कंपन्यांसाठीच असून सोसायट्यांसाठी नसेल, असे महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिस मिर्झा यांनी सांगितले.