राखीव वन अनुसंधान केंद्रातील खैर चोरीला; किमती झाडांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 11:58 PM2020-03-12T23:58:54+5:302020-03-12T23:59:08+5:30
जमीन बीज भूखंडसाठी सहा अनुवंश शास्त्रज्ञ वन अनुसंधान केंद्रासाठी वाडा यांना दिली आहे. मात्र जबाबदारी आमची आहे. तेथे अडीच महिने अगोदर खैराची कत्तल झाली होती.
मनोर : मनोर-पालघर रस्त्यावर चहाडे गावाच्या हद्दीतील राखीव वन अनुसंधान केंद्रातील भले मोठे खैर जातीचे किमती झाड कत्तल करून चोरीस गेल्याची घटना घडली आहे.
मनोर-पालघर मुख्य रस्त्याच्या बाजूला चहाडे गावाच्या हद्दीत घनदाट जंगलात खैर जातीचे उत्तम दर्जाची झाडे आहेत. त्यासाठी शासनाने २०११-१२ ला ५ हेक्टरमध्ये सहा अनुवंश शास्त्रज्ञ वन अनुसंधान केंद्राची स्थापना केली होती. तेव्हापासून नागपूर व अनेक जिल्ह्यातील त्या खैर झाडांचे संशोधन (रिचर्स) करण्यासाठी वन विभागाचे क्लास वन अधिकारी व इतर अधिकारी कर्मचारी येतात. बीज भूखंड राखीव वन म्हणून पालघर वनक्षेत्र अधिकारी अंतर्गत येत असून त्या ठिकाणावरून कोणी तरी अज्ञात इसमांनी खैर झाडांची कत्तल करून लाकडे लंपास केली आहेत. रात्रंदिवस रहदारीचा रस्ता असून सुद्धा खैर झाडांची कत्तल होते. तसेच गेल्या महिन्यात कोकनेर गावाच्या हद्दीतही खैर झाडांची कत्तल झाली होती. त्यातील काही लाकडे नेटाली डेपोत जमा केली होती, तर काही लाकडे लंपास केली होती. वन विभाग डहाणू अंतर्गत येणारे वन क्षेत्रीय अधिकारी पालघर यांच्या कार्यक्षेत्रातील चहाडे गावाच्या हद्दीतील जमीन महाराष्ट्र शासनाचा सहा अनुवंश शास्त्रज्ञ वन अनुसंधान केंद्रास खैर बीज भूखंड म्हणून दिलेली आहे. त्याची देखरेख करण्याची जबाबदारी वनपाल क्षेत्र चहाडे यांची असून झाडांची कत्तल झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर वनमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे.
आरोपी पकडले तपास चालू असल्याचा दावा
यासंदर्भात पालघरचे वनक्षेत्रीय अधिकारी पंकज पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, तेथील वनपाल यांच्याशी संपर्क करा. ते सविस्तर माहिती देतील. तेच गुन्ह्याचा तपास करीत आहेत. चहाडे येथील वनपाल एम. राठोड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जमीन बीज भूखंडसाठी सहा अनुवंश शास्त्रज्ञ वन अनुसंधान केंद्रासाठी वाडा यांना दिली आहे. मात्र जबाबदारी आमची आहे. तेथे अडीच महिने अगोदर खैराची कत्तल झाली होती. तो माल सर्व नेटाली डेपोमध्ये आणला आहे. आरोपी पकडले आहेत. तपास चालू आहे.