बोईसर स्थानकात तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 11:12 AM2019-02-18T11:12:28+5:302019-02-18T11:47:40+5:30
ऐन गर्दीच्या वेळी सोमवारी पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू आहे. बोईसर स्थानकात ओव्हरहेड वायरला हात लावून तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
पालघर - ऐन गर्दीच्या वेळी सोमवारी (18 फेब्रुवारी) पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू आहे. बोईसर स्थानकात ओव्हरहेड वायरला हात लावून तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रेल्वेने तातडीने वीजपुरवठा खंडित केल्याने अनर्थ टळला आहे. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांना तरूणाला खाली उतरवण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोईसर रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी सासरच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. मोहम्मद तमन्ने असं या तरुणाचं नाव असून तो बिहार येथील समस्थिपूरचा रहिवासी आहे. मोहम्मदने हातात एक चाकू घेऊन बोईसर रेल्वे स्थानकाच्या 25 हजार वोल्टचा विद्युत प्रवाह वाहत असणाऱ्या ओव्हर हेड ब्रिजच्या खाली उतरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोन तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला ताब्यात घेत पोलिसांच्या हवाली केले आहे.
पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटांनी उशिराने, बोईसर स्थानकात ओव्हरहेड वायरला हात लावून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, रेल्वेने तातडीने वीजपुरवठा खंडित केल्याने तरुण बचावला #WesternRailway
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 18, 2019
पुलवामा येथे जवानांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी (16 फेब्रुवारी) नालासोपारा येथे नागरिकांनी रेल रोको केला होता. या रेलरोकोमुळे नालासोपारा ते विरार या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, चार तासांनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. जम्मू काश्मीरमधील पुलमावा येथे दहशतवाद्यांना केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 जवानांना वीरमरण आले आहे. या घटनेनंतर देशभरात तीव्र संतापाचे वातावरण आहे. शनिवारी नालासोपारा येथे रेल्वे प्रवासी उत्स्फूर्तपणे रेल्वे ट्रॅकवर उतरले होते. ट्रॅकवर उतरलेल्या नागरिकांकडून पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती.