पश्चिम रेल्वे पूर्वपदावर, अर्धा तास विलंब सुरूच
By admin | Published: July 7, 2016 03:01 AM2016-07-07T03:01:57+5:302016-07-07T03:01:57+5:30
डहाणूरोड रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे ११ डब्बे घसरल्याने सोमवार पासून विस्कळीत झालेली पश्चिम रेल्वेमार्गावरील वाहतूक बुधवार सकाळपासून बहुतांशी पूर्ववत झाली आहे.
डहाणू : डहाणूरोड रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे ११ डब्बे घसरल्याने सोमवार पासून विस्कळीत झालेली पश्चिम रेल्वेमार्गावरील वाहतूक बुधवार सकाळपासून बहुतांशी पूर्ववत झाली आहे. वेळापत्रकात सध्या जाणवणारा अर्ध्यातासाचा विलंब येत्या चोवीस तासांत दूर होणार आहे.
पूर्णपणे उखडलेली रेल्वेलाईन पूर्ववत करण्यासाठी रेल्वेचे सहाशे कर्मचारी व अधिकारी अहोरात्र काम करीत होते. मुंबईकडे जाणाऱ्या अप आणि गुजरात कडे जाणाऱ्या डाऊन गाड्या अर्धातासाच्या उशिराने धावत आहेत. उपनगरी लोकलसेवा ही डहाणूरोड पर्यंत पूर्ववत सुरू करण्यात आली आह. येत्या एकदोन दिवसात रेल्वेस्लीपर टाकणे, सिग्नल यंत्रणा बसविणे, त्याच बरोबर नव्याने रूळ टाकणे आणि ओव्हरहेड लाईन टाकण्याचे काम पूर्ण होताच रेल्वेसेवा सुरळीत सुरू होईल असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
आज सकाळी गुजरातकडे जाणारी इंटरसिटी एक्सपेस, सौराष्ट्र एक्सप्रेस, सुरत शटल, फिरोजपुर जनता एक्स्प्रेस या गाड्या सोडण्यात आल्या. मात्र, अपघाताच्या ठिकाणी क्रॉसिंग पार करण्यासाठी सर्व मेल, एक्सप्रेस गाड्याना धीम्या कराव्या लागल्याने पंधरा बीस मिनिटे उशिराने धावत आहेत. (वार्ताहर)