पश्चिम रेल्वेकडून मराठीचा अवमान?
By admin | Published: April 1, 2017 05:11 AM2017-04-01T05:11:33+5:302017-04-01T05:11:33+5:30
पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईत असूनही पश्चिम रेल्वे महाराष्ट्राच्या राजभाषेचा हेतुपुरस्पर दुजाभाव करून
वसई : पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईत असूनही पश्चिम रेल्वे महाराष्ट्राच्या राजभाषेचा हेतुपुरस्पर दुजाभाव करून अवमान करीत असल्याची तक्रार रेल्वे मंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
१९६५ च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ५ (महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४) अन्वये मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला आहे. तिची लिपी देवनागरी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर मराठी भाषा ही वर्जित प्रयोजना व्यतिरिक्त इतर प्रयोजनासाठी राज्यात उपयोगात आणावयाची भाषा झाली. भारताच्या संविधानाच्या अनुसूची ८ मध्ये एकूण २२ भाषांचा निर्देश असून त्यात मराठी भाषा १३ व्या क्रमांकावर आहे. मराठी हा राजभाषा असल्याचे घोषित करणारा कायदा विधीमंडळात मंजूर होऊन ११ जानेवारी १९६५ ला राजपत्रातून जाहीरही करण्यात आले. तरीही पश्चिम रेल्वेकडून राजभाषेचा अवमान केला जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. डहाणू ते बोरीवली दरम्यान रेल्वे स्थानकांवरील तक्रार पुस्तिकेत मराठी पर्याय उपलब्ध नसणे, डहाणू ते चर्चगेट स्थानकांवर मराठीत उद्घोषणा न करणे, गाड्यांवर मराठी पाट्या नसणे, तिकीटे व त्यावरील सूचना मराठीत नसणे, रेल्वेच्या इमारतींवर मराठीत नाव नसणे, उपहार गृहे, खानपान केंद्रात मराठीचा वापर न करणे, माहिती अधिकार, तक्रारी, टिष्ट्वटर, इमेल आणि वेब साईटमधून मराठीतील तक्रारींना उत्तरे न देणे हा मराठीचा अवमान असल्याची तक्रार रेल्वेमंत्र्याकडे त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)