मोबाइल चार्जिंगसाठी काय पण, कोर्टाने आकारला २०० चा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 06:13 AM2018-07-15T06:13:08+5:302018-07-15T06:13:16+5:30
जसं प्रेमासाठी वाट्टेल ते ! त्याच धर्तीवर आपल्या मोबाईल करता आजची तरुणाई काय करू शकेल याचा काहीही नेम नाही, अशीच एक घटना वसई रोड स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
वसई : जसं प्रेमासाठी वाट्टेल ते ! त्याच धर्तीवर आपल्या मोबाईल करता आजची तरुणाई काय करू शकेल याचा काहीही नेम नाही, अशीच एक घटना वसई रोड स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. वसई रोड स्टेशन हद्दीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे स्वीच काढून त्या सॉकेटमध्ये आपले मोबाईल चार्ज करणाºया एकूण १७ इसमांवर रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई केली आहे.
मागील सहा दिवस झाले वसईत मुसळधार पाऊस आहे, त्यामुळे दोन दिवस वीज खंडित झाल्याने अनेक लोकांच्या मोबाईलचे चार्जिंग संपल्याने बंद पडले होते. मात्र, वसईतील विविध भागातील १७ तरूणांनी आपले मोबाईल चार्ज करण्यासाठी चक्क सी सी टीव्ही कॅमेºयांचे स्वीच काढून त्या सॉकेटमध्ये आपले मोबाईल चार्ज करण्यासाठी लावले.
त्यामुळे रेल्वे स्टेशन हद्दीतील बहुतांशी सी सी टीव्ही कॅमेरे बंद स्थितीत आढळले. ही गंभीर बाब आर पी एफ च्या लक्षात आल्यावर त्यानी मोबाईल चार्ज करणाºया त्या १७ इसमांवर कारवाई केली.
रेल्वेच्या सुविधेला बाधा पोहचवणे, मालमत्तेशी छेडछाड करणे, या रेल्वे अधिनियम १४५ बी आणि सी कलमान्वये कारवाई केली आहे. तर रेल्वे कोर्टाने या सतरा जणांना दोनशे रूपये दंड आकाराला आहे. मात्र, याबाबत अधिक माहिती देण्यास रेल्वे सुरक्षा दलाने नकार दिला आहे.