बँकांच्या बाहेरील गर्दीचे करायचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 11:47 PM2021-05-03T23:47:27+5:302021-05-03T23:47:44+5:30
वाढत्या रुग्णसंख्येची चिंता : मजूर, पेन्शनधारकच अधिक, सामाजिक अंतराचा फज्जा
हुसेन मेमन
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून ग्रामीण भागातही रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. यासाठी सरकारने कडक संचारबंदी आणि लाॅकडाऊनसारखे पाऊल उचलले आहे. गर्दी नियंत्रणात आणून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरीही अर्थचक्र थांबू नये, यासाठी बँका सुरूच ठेवण्यात आल्या आहेत; परंतु ग्रामीण भागातही बँकांसमोर होणारी गर्दी चिंता निर्माण करीत असून या गर्दीचे करायचे काय, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. भल्या मोठ्या रांगाच्या रांगा आजही बँकेच्या बाहेर दिसत आहेत. सोशल डिस्टन्सचा पुरता फज्जा उडालेला असून खेडोपाड्यातील मजूर, पेन्शनधारक अशा विविध ग्राहकांची दररोज बँकेसमोर भली मोठी गर्दी बघावयास मिळत आहे.
जव्हार तालुक्यात दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढला आहे. त्यामुळे खेडोपाड्यातील हजारो नागरिक बाधित झाले व कित्येक नागरिकांना कोरोनामुळे आपला जीवही गमवावा लागला आहे. मात्र हातावर पोट असलेल्या ग्रामीण भागातील मजुरांना व पेन्शनधारकांना कुटुंबांचे पालनपोषण करण्यासाठी दुसरे कुठलेच साधन नाही. त्यामुळे मजूरवर्ग आपला जीव धोक्यात टाकून दिवसभर उन्हात उभे राहून बँकेतून पैसे काढण्यासाठी ताटकळत आहेत.
प्रशासनाचे नियंत्रण नाही?
जव्हारसारख्या भागांत बँकांबाहेर होत असलेली गर्दी लक्षात घेता बँक प्रशासनाचे या गर्दीवर नियंत्रण नसल्याचेच दिसून येत आहे. लोकांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पैसे हवे असतात. त्यासाठी हे लोक बँकेत येत असतात; परंतु लोकांची होत असलेली गर्दी कोरोना प्रादुर्भावाला कारणीभूत ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दररोज ४००-५०० लोक तरी बँकेत येत असतात. काही लोकांच्या खात्यात पैसेही नसतात, तरीही ते रांगेत उभे राहतात. आम्ही त्यांचे पासबुक घेऊन त्यांच्या खात्यात पैसे जमा नसल्याचे सांगतो. त्यांच्या मजुरीचे पैसे पडलेले नसतात, मात्र लोकांच्या गरजा आहेत म्हणून ते येतात. मध्यंतरी आम्ही पोलिसांनाही कळवले होते.
- अभिजीत कुलथे, महाराष्ट्र बँकेचे मॅनेजर, जव्हार
माझे वडील धनाजी टोकरे यांची पेन्शन काढण्यासाठी सकाळपासून बँकेच्या बाहेर उभा आहे. वडिलांचे वय झाल्यामुळे त्यांना जास्त वेळ उभे राहता येत नाही म्हणून मी रांगेत उभा राहून नंबर लावत आहे.
- संतोष धनाजी टोकरे, ग्राहक, गरडवाडी
मजुरीसाठी दिवसभर बँकेच्या बाहेर उन्हात आम्ही उभे राहतो, मात्र पहिल्या दिवशी नंबर लागला नाही तर पुन्हा दुसऱ्या दिवशी उन्हात उभे राहावे लागत आहे. बँकेने टोकन पद्धत सुरू केल्यास ग्राहकांचा वेळ वाचेल आणि गर्दीही होणार नाही.
- पांडुरंग कृष्णा पागी, ग्राहक, जांभूळविहीर, जव्हार
आम्ही बँकेला काही दिवस बंद ठेवण्यासाठी सांगितले होते. मात्र बँका परत उघडल्यावर जास्त गर्दी होईल, त्यामुळे पर्यायी म्हणून बँकेच्या जागा क्षमतेनुसार दिवसाला ५० ते १०० ग्राहकांना टोकन वाटप करून तितकेच ग्राहक बँकेने करावे आशा सूचना दिल्या आहेत.
- संतोष शिंदे, तहसीलदार, जव्हार