स्वातंत्र्याने दिले काय…अहो, आदिवासींपर्यंत पोहोचलंच नाय! मूलभूत सुविधांची वानवा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 01:35 PM2023-11-30T13:35:31+5:302023-11-30T13:36:10+5:30
Palghar: आधुनिकतेकडे वाटचाल करत मोनो, मेट्रो बुलेट ट्रेन चालवणाऱ्या महाराष्ट्रात आजही रस्त्याअभावी येथील आदिवासींना कोसो मैलाची जीवघेणी पायवाट तुडवावी लागत आहे. पालघर जिल्ह्यातील अनेक गाव पाड्यांना पाणी, रस्ते, वीज, आरोग्य या सुविधांची प्रतीक्षा आहे.
- रवींद्र साळवे
मोखाडा - विकासाच्या नावावर दिवसागणिक रस्ते विकासाचे जाळे विस्तारत असून, विविध महामार्ग प्रगतिपथावर नेण्याचे दावे केले जात आहेत. आधुनिकतेकडे वाटचाल करत मोनो, मेट्रो बुलेट ट्रेन चालवणाऱ्या महाराष्ट्रात आजही रस्त्याअभावी येथील आदिवासींना कोसो मैलाची जीवघेणी पायवाट तुडवावी लागत आहे. पालघर जिल्ह्यातील अनेक गाव पाड्यांना पाणी, रस्ते, वीज, आरोग्य या सुविधांची प्रतीक्षा आहे. यामुळे स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांनंतरही मूलभूत गरज पूर्ण होण्यासाठी झटावे लागत असेल तर, ‘स्वातंत्र्याने दिले काय…अहो, आदिवासींपर्यंत पोहोचलंच नाय! असे चित्र यानिमित्ताने पाहायला मिळत आहे.
पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट
पावसाळ्यात तर चार महिने पूर्णत: संपर्क तुटतो. अक्षरश: बेटावरचे जीवन काढावे लागते. मागील पावसाळ्यात ओसंडून वाहणाऱ्या नदीतून पलीकडे जाताना एक शाळकरी मुलगा नदीच्या प्रवाहातून वाहून जाताना गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्यांचे प्राण वाचले अशा घटना येथे वारंवार घडतात.
येथे पुलाची सोय व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय, परंतु या पाड्याची लोकसंख्या कमी असल्याचे कारण प्रशासनाकडून दिले जात आहे.
- बाळू घाटाळ,
सरपंच, आडोशी शिरसगाव
पालघर जिल्ह्यातील अनेक गावात असे चित्र आहे. देशाची आर्थिक राजधानी, स्वप्ननगरी मुंबईपासून १०० किमी अंतरावर, तर मोखाडा तालुक्याच्या मुख्यालयापासून १५ ते २० किमी अंतरावर दरी डोंगरात आडोशी शिरसगाव ग्रामपंचायतीच्या अंतर्गत अगदी मोखाडा खोडाळा रस्त्यावर देवबांधपासून काही मैलाच्या अंतरावर, थाळेकरवाडी १६ घरे व ७० लोकसंख्या असलेल्या या पाड्यावरील आदिवासी बांधव नदीच्या पलीकडे वास्तव्य असल्याने रस्ता व पुलाअभावी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
पुलाअभावी होतेय गैरसोय
विकासाच्या नावाखाली मोखाड्यात नको त्या ठिकाणी संरक्षण भिंती बांधून करोडो रुपये खर्च केले जातात; परंतु ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पुलाची गरज आहे तिथे दुर्लक्ष न करता शासनाने लक्ष देऊन थाळेकरवाडी येथे रस्ता व पूल उभारणीची गरज आहे याबाबत आम्ही सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती यांनी बोलताना सांगितले.
आमची कुटुंबं गेल्या १०० वर्षांपासून इथे वास्तव्य करत आहेत. चारही बाजूने नदी असल्याने पावसाळ्यात आमच्या पाड्याचा संपूर्ण संपर्क तुटतो. शाळकरी मुले, वृद्ध व्यक्ती कामानिमित्त ये-जा करणाऱ्या लोकांना अडचणीचा सामना करावा लागतो. आजारी पेशंटला डोली करून नदी पार करावी लागते.
- संदीप थाळेकर, सामाजिक कार्यकर्ते