बोया बसविणार कधी?
By admin | Published: August 12, 2016 01:30 AM2016-08-12T01:30:03+5:302016-08-12T01:30:03+5:30
सातपाटी, मुरबे येथून समुद्रात मासेमारिला जाताना धोकादायक खड्का पासून बचाव व्हावा, यासाठी समुद्रात
पालघर : सातपाटी, मुरबे येथून समुद्रात मासेमारिला जाताना धोकादायक खड्का पासून बचाव व्हावा, यासाठी समुद्रात उभारलेला बोया मागील दोन महिन्यापासून शिरगावच्या किनाऱ्यावर बेवारस अवस्थेत तसाच पडून आहे. हा बोया पुन्हा मूळ जागेवर लावण्या संदर्भात मेरी टाईम बोर्डाला कळवूनही तो तसाच पडून आहे. त्यामुळे एखादा अपघात घडल्यास संबंधीत अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी मच्छीमारांमधून केली जात आहे.
सातपाटी हे एक प्रगतीशील बंदर असून मुरबे, सात पाटी, खारेकुराण या बंदरातून सुमारे ३०० ते ४०० लहान मोठ्या नौकांद्वारे मासेमारी केली जाते. सातपाटी खाडीत अनेक वर्षा पासून गाळ साचून अनेक धोकादायक खडक निर्माण झाले असून त्यापासून नौकांचे रक्षण व्हावे म्हणून नौकानयन मार्गासह समुद्रात अनेक ठिकाणी दीपस्तंभ आणि लाईट बोये बसविण्यात आले होते. माजी आमदारांच्या फंडातून समुद्रात (धावती पट्टा) बसविलेला बोया २० ते २५ जून दरम्यान तुटून शिरगावच्या समुद्रकिनारी बेवारस पडून होता. १ आॅगस्ट पासून मासेमारी हंगामाला सुरु वात झाली असल्याने व त्या दरम्यान समुद्रात जोरदार वारे वाहून मोठ्या लाटा उसळत असल्याने समुद्रात मासेमारिला जाणाऱ्या नौकांना या धोकादायक खडकांचा अंदाज न आल्यास मोठ्या जीवित आणि आर्थिक नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. सातपाटी सर्वोदय सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुरेश म्हात्रे यांनी मेरिटाईम बोर्डाला पत्र देऊन तात्काळ कार्यवाही करून हा बोया लावून द्यावा ही मागणी करूनही मेरिटाईम बोर्ड मात्र टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे जर समुद्रात एखादी नौका खडकावर आदळुन अपघात झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी मच्छीमारां मधून केली जात आहे. (प्रतिनिधी)