उपनिबंधक कार्यालयात रिक्त पदांची भरती कधी?; वसईतील स्थिती, कामाचा वाढला ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 12:51 AM2021-03-25T00:51:56+5:302021-03-25T00:52:34+5:30
राज्यात सर्वाधिक गृहनिर्माण संस्था असलेला वसई हा एकमेव तालुका आहे. वसई तालुका उपनिबंधक कार्यालयात एकूण आठ पदे शासनाच्या वतीने मंजूर असली तरी वर्ग ३ ची दोन पदे आजपर्यंत रिक्त आहेत.
आशिष राणे
वसई : तालुक्यातील ग्रामीण व शहरातील सहकारी संस्थांचा कारभार उत्तमरीत्या वसई उपनिबंधक कार्यालय जरी सांभाळत असले तरी हा कारभार अजूनही शासनाच्या सन १९८१ च्या शासन आकृतिबंधानुसारच सुरू आहे, मात्र त्या सर्वाधिक कामकाजाचा त्रास उपलब्ध उपनिबंधक व सहकारी यांना होत आहे.
राज्यात सर्वाधिक गृहनिर्माण संस्था असलेला वसई हा एकमेव तालुका आहे. वसई तालुका उपनिबंधक कार्यालयात एकूण आठ पदे शासनाच्या वतीने मंजूर असली तरी वर्ग ३ ची दोन पदे आजपर्यंत रिक्त आहेत. एकूण वर्ग ३ नुसार ६ पदे मंजूर आहेत, परंतु त्यापैकी शासनाने ४ पदेच भरलेली आहेत. शिपायांचे म्हणजे वर्ग ४ चे एक पद भरलेले आहे, शिवाय वर्ग १ म्हणजेच उपनिबंधक स्वत:, पैकी मंजूर पदे वर्ग ३ पैकी ४ भरलेली आहेत व २ अजूनही रिक्त आहेत, मात्र वर्ग ४ पैकी १ मंजूर पद भरलेले आहे.
विशेष म्हणजे आज तालुक्यातील लोकसंख्या ३० लाखांच्या वर आहे व वसई, नालासोपारा, विरार व ग्रामीण भागातील शेतकरी संख्या, संस्था व गृहनिर्माण संस्था यांची संख्या सर्वाधिक म्हणजे ७ हजारच्या आसपास आहे. त्यातच महापालिका शहर भाग व ग्रामीण भागातील संस्था पाहिल्या तर तक्रारीचे प्रमाण जास्त आहे. त्यातून मधल्या काळात वर्ग ३ चा एक अधिकारी पालघर जिल्हा उपनिबंधक कार्यालयात बदली केल्याने अजूनही वसईत कामांची आबाळ झाली.
वसई ग्रामीण व शहरासह तालुक्यात ८० हून अधिक सहकारी व नोकरदार पतसंस्था आहेत. या सर्वांचा कारभार सांभाळला जाण्यासोबतच पीककर्ज वाटप, पीक कर्जावरील व्याजमाफीचे महत्त्वाचे कामदेखील याच कार्यालयामार्फत केले जाते. विशेषत: गृहनिर्माण संस्था व अवैध सावकारीला आळा घालण्याची जबाबदारी या कार्यालयावर आहे. परंतु ही सर्व कामे करण्यासाठी आवश्यक कर्मचारी संख्या आजही उपलब्ध नाही. सहकार खात्याचा मंजूर आकृतिबंध १९८१ ला आला, मात्र त्या वेळी इथे सहायक उपनिबंधक पद होते. मात्र जशी लोकसंख्या वाढली, संस्था वाढल्या, त्यानुसार शासनाचा आकृतिबंध व कर्मचारी, अधिकारी संख्या वाढली नाही. त्यामुळे आजवर याबाबतीत प्रत्येक तालुक्यातील उपनिबंधक कार्यालयातील उपनिबंधकसहित कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे.
आज वसईत ७ हजारच्या वर अधिक संस्था कार्यरत आहेत. पैकी ६ हजार ५०० हून अधिक गृहनिर्माण संस्था आहेत. तीन सहकारी बँका आहेत. त्यामुळे नक्कीच तक्रारींचे प्रमाण अधिक आहे.सद्य:स्थितीत या कार्यालयात एकूण ८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ६ पदांवर कर्मचारीवर्ग आहे. केवळ दोन पदे, तीही वर्ग ३ ची अद्यापही रिक्त आहेत. तक्रारी आहेत, पण निरसन व कामे कधी करणार? असा सवाल विचारला जात आहे.
अपुऱ्या मनुष्यबळाचा कामकाजावर परिणाम
- सध्या वर्ग १ नुसार उपनिबंधक हे पद त्यात मंजूर वर्ग ३ नुसार ६ पदे मंजूर आहेत. पैकी २ पदे अजूनही रिक्त आहेत, तर वर्ग ४ चे पद मंजूर व भरलेलं आहे.
- अर्थातच वर्ग १ व वर्ग ३ मधील ४ मंजूर व भरलेल्या पदांमुळेही तालुक्यातील कारभारात सुसूत्रता येत नाही. आजही जेमतेम तीन वा चार अधिकारी - कर्मचारी वर्गावर या वसई उपनिबंधक कार्यालयाचा कारभार सुरू आहे.
- परिणामी, गृहनिर्माण संस्थांच्या तक्रारीचे प्रमाण जास्त आहे, तर सोबत सावकारीच्या तक्रारी व इतरही अनेक कामे खोळंबून राहत असल्याचे दिसत आहे.