रूग्णालयाला दोन कोटी कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 05:26 AM2018-08-31T05:26:31+5:302018-08-31T05:27:03+5:30
आमदार, खासदारांनी लक्ष घालण्याची गरज : मुख्यमंत्री सहायता फंडातून घोषित
हितेंन नाईक
पालघर : येथील ३० खाटांच्या क्षमतेच्या ग्रामीण रुग्णालयाच्या २० खाटा वाढविण्यासाठी मंजूर झालेले २ कोटी रूपये कधी मिळणार? असा प्रश्न जनतेला पडला आहे. मुख्यमंत्री साहय्यता निधीतून मंजूर झालेला हा निधी तातडीने रुग्णालयाला मिळावा यासाठी खा.राजेंद्र गावित व पालकमंत्री सवरा आणि आमदार घोडा यांनी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे.
या रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आदींना कार्यक्षेत्रा बाहेरून आलेल्या अतिरिक्त रु ग्णांचा मोठा भार सहन करावा लागत असूनही वाढीव २० खाटांच्या मागणीचा प्रस्ताव आरोग्य विभागा कडे पडून आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत या ग्रामीण रुग्णालयाच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन १२ जून २०१० रोजी करण्यात आले होते. त्यानंतर ८ नोव्हेंबर २०१२ रोजी तत्कालीन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी ह्यांच्या हस्ते ह्या इमारतीचे उदघाटनही करण्यात आले. मात्र सुरुवाती पासूनच ह्या रु ग्णालयाला समस्यांचे लागलेले ग्रहण आज ८ वर्षा नंतरही सुटलेले नाही. उलट ते दिवसेंदिवस गंभीर होत असून रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत. त्यामुळे उपचारासाठी रु ग्णांच्या नातेवाईकांपुढे गुजरात किंवा सिल्व्हासा येथील रुग्णालयात जाण्याशिवाय पर्यायच उरत नाही.
कागदोपत्री तरी हे रुग्णालय सोईसुविधानी अद्यावत असेल असे वाटत असले तरी प्रत्यक्षात पाहणी अंती मात्र एक्सरे बंद,गाद्या फाटलेल्या, चादरी अस्वच्छ, व्हरांड्यात एका पलंगावर दोन-दोन रुग्ण, रुग्णांच्या लांबच लांबा रांगा,अश्या परिस्थितीत सध्या ग्रामीण रुग्णालय सुरू आहे.
बहुसंख्य कक्ष कागदी
३० खाटांची क्षमता असलेल्या ह्या ग्रामीण रु ग्णालयात वैद्यकीय अधीक्षक कक्ष, आपत्कालीन कक्ष, औषधोपचार कक्ष, प्रयोग शाळा कक्ष, क्ष किरण कक्ष, नेत्र/क्षयरोग विभाग, प्रसूती कक्ष, नवजात शिशु स्थिरीकरण कक्ष, शस्त्रक्रि या विभाग,प्रसूती पश्चत व नवजात बालक कक्ष, स्त्री व पुरु ष आंतररु ग्ण कक्ष, हिरकणी कक्ष आदी २९ कक्षांची उभारणी करण्यात आली आहे. ती कागदावरच आहे.