नॉन कोविड रुग्णांच्या शस्त्रक्रिया करायच्या कधी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 12:19 AM2021-04-22T00:19:33+5:302021-04-22T00:19:41+5:30
तुटवडा ऑक्सिजनचा : रुग्णांमध्ये पसरले चिंतेचे वातावरण
- मुरलीधर भवार
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाची पहिली लाट मागच्या वर्षी आली. तेव्हा महापालिकेकडे केवळ दोन सरकारी रुग्णालये आणि १५ ठिकाणची नागरी आरोग्य केंद्रे अशी आरोग्य व्यवस्था होती. मात्र, ही दोन्ही रुग्णालये कोविड रुग्णालये केल्यास नॉन कोविड असलेल्या अन्य रुग्णांवर उपचार कसे करणार. त्यांना कुठून उपचार मिळणार. सामान्याला खासगी रुग्णालये दाद देणार नाही. ही बाब विचारात घेऊन या दोन्ही रुग्णालयांपैकी केवळ शास्त्रीनगर रुग्णालय कोविड रुग्णालय केले. रुक्मिणीबाई रुग्णालय नॉन कोविड रुग्णालये ठेवले होते.
आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता पाहता शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई रुग्णालयात संशयित कोविड रुग्णांसाठी प्रत्येकी एक वॉर्ड सुरू केला आहे. महापालिकेने मागच्या वेळी ३६ खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णांवर उपचाराची परवानगी दिली होती. दुसरी लाट ही जास्त रुग्ण बाधित करणारी असल्याने वाढती रुग्णसंख्या पाहता महापालिका हद्दीत आतापर्यंत महापालिकेने सात कोविड रुग्णालये सुरू केली आहेत. तर ८७ खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णांवर उपचाराची परवानगी दिली आहे. सरकारी रुग्णालयात एक हजार १४४ बेड उपलब्ध आहेत. तर खासगी कोविड रुग्णालयात दोन हजार ३७६ बेड उपलब्ध आहे.
या व्यतिरिक्त नॉन कोविड रुग्णालये २१९ आहेत. त्यामुळे नॉन कोविड रुग्णांना बेड मिळत नाही, अशी तक्रार कमी आहे.
मात्र, नॉन कोविड रुग्णांवरील शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागत आहेत. त्याचे कारण कोविड रुग्णांनाच पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. म्हणून ऑक्सिजनअभावी नॉन कोविड रुग्णांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ येत आहे.
रुग्णांची गैरसोय
ऑक्सिजनचा तुटवडा आहे. महापालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन पुरेसा आहे. मात्र, खासगी नॉन कोविड रुग्णालयांची त्यांच्या अनावश्यक शस्त्रक्रिया पुढे ढकलल्यास शस्त्रक्रियेसाठी लागणारा ऑक्सिजन कोविड रुग्णाला देता येऊ शकते, अशी सूचना राज्याच्या कोविड कृती समितीने महापालिकेच्या माध्यमातून खासगी नॉन कोविड रुग्णालयांना केली आहे. नॉन कोविड रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी त्रास सहन करावा लागत आहे.
८७ खासगी रुग्णालयात कोविडचे उपचार
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत ८७ खासगी कोविड रुग्णालये आहेत. या रुग्णालयातून कोविड रुग्णांसाठी २ हजार ३७६ बेड उपलब्ध होत आहेत. त्यात जनरल, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अशा बेडचा समावेश आहे. जनरल बेड रुग्णांना मिळताहेत. मात्र, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नाहीत. रुग्णालयांनी क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण उपचारासाठी दाखल करून घेऊ नयेत असे, आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी खासगी कोविड रुग्णालयांना दिले आहेत. नॉन कोविड रुग्णालयांची संख्या २१९ आहे. त्याठिकाणी बेड उपलब्ध आहेत.
लहान रुग्णालयांना भेडसावते ही समस्या
मागच्या आठवड्यात एका कॅन्सर रुग्णावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागली. ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ आली. ही समस्या लहान स्वरूपाच्या रुग्णालयांना ऑक्सिजनअभावी भेडसावत आहे.
-डॉ. अनिल हेरुर,
कॅन्सर सर्जन, डोंबिवली.
कोविडच्या भीतीपोटी सहव्याधी असलेले हृदयरोग, रक्तदाब अन्य आजाराचे रुग्ण नॉन कोविड रुग्णालयात उपचारासाठी येण्यासाठी घाबरतात. नॉन कोविड रुग्णांना बेड मिळतोय. मात्र, उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाणच कमी आहे.
-डॉ. पंकज पाटील,
कॉर्डिओलॉजिस्ट, कल्याण.