पालघऱ जिल्ह्याला सुसज्ज अग्नीशमनदल कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 05:58 AM2018-03-10T05:58:38+5:302018-03-10T05:58:38+5:30

तारापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्याला गुरुवारी लागलेली आग आणि ती विझविण्यास पुरेशी यंत्रणा नसल्याने आगीच्या भक्षस्थानी पडलेले पाच इतर कारखाने यांनी पालघर जिल्ह्यातील अग्नीशमन यंत्रणेच्या कुचकामीपणावर बोट ठेवले आहे. साडे सात हजारांहून अधिक कारखाने असलेल्या व रिलायन्स एनर्जी आणि बीएआरसी असे प्रचंड प्रकल्प असलेल्या या

When is the well equipped fire extinguisher in Palghar district? | पालघऱ जिल्ह्याला सुसज्ज अग्नीशमनदल कधी?

पालघऱ जिल्ह्याला सुसज्ज अग्नीशमनदल कधी?

Next

विशेष प्रतिनिधी
पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्याला गुरुवारी लागलेली आग आणि ती विझविण्यास पुरेशी यंत्रणा नसल्याने आगीच्या भक्षस्थानी पडलेले पाच इतर कारखाने यांनी पालघर जिल्ह्यातील अग्नीशमन यंत्रणेच्या कुचकामीपणावर बोट ठेवले आहे. साडे सात हजारांहून अधिक कारखाने असलेल्या व रिलायन्स एनर्जी आणि बीएआरसी असे प्रचंड प्रकल्प असलेल्या या परिसरात जर अग्नीकांड घडले तर त्याला वेळीच आवर घालणारी प्रभावी यंत्रणा या जिल्ह्यात अस्तित्वात नाही.
जिल्ह्यात वसई-विरार महानगरपालिका ही एकच महापालिका आहे. तिची सुद्धा अग्नीशमन यंत्रणा पुरेशी मजबूत नाही. डहाणू, जव्हार आणि पालघर या तीन नगरपालिका जिल्ह्यात आहेत. परंतु त्यांच्याकडे उत्पन्नाची पुरेशी साधने नसल्याने अग्नीशमन दलाच्याबाबतीत तिथेही बोंब आहे. चार नव्या नगरपंचायती जिल्ह्यात अस्तित्वात आल्या. परंतु त्यांचीही अवस्था भिक्षांदेही स्वरुपाची आहे. त्यामुळे स्वतंत्र अशी अग्नीशमन यंत्रणा उभारण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी एम.एम.आर.डी.ए. आणि जिल्ह्याचे नवे मुख्यालय उभारणाºया सिडकोनेच पुढाकार घेणे आवश्यक आहे.
वाडा, कुडूस या पट्ट्यामध्ये जवळपास हजारएक कारखाने आहेत. परंतु भिवंडी, कल्याण आणि ठाणे या तीन महापालिकांच्या जवळ हा पट्टा असल्याने तेथील अग्नीतांडवाचे शमन कसेबसे होते. परंतु बोईसर, तारापूर, वसई, विरार आणि त्या लगतचा पट्टा येथे असलेल्या कारखान्याच्या बाबतीत अग्नीशमन हे आव्हानच ठरते. वसईहून अग्नीशामक बंब पालघर, तारापूर, बोईसर येथे पाठवायचा म्हटला की, ९० किलोमीटरचे अंतर कापावे लागते. तर ठाणे, भिवंडी, कल्याण येथील बंबांना सव्वाशे ते दीडशे किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यात खराब रस्ते, वाहतूककोंडी यामुळे स्थिती बिकट होते. याशिवाय एकदा भरलेला बंब रिकामा झाल्यास तो भरायचा कुठे? व कसा? ही समस्या उभी राहते.
गुरुवारी रात्री लागलेली आग विझविणारे बंब रिकामे झाल्यावर ते पुन्हा भरण्यासाठी साध्या वॉटर टँकरमधील पाण्याचा वापर केला गेला. या कारखान्यांमध्ये अग्नीशमन यंत्रणेचा पूर्ण अभाव आहे, तर काहींनी नाममात्र स्वरुपात त्या उभारल्या आहेत. औद्योगिक सुरक्षिततेचे नियम तर बहूसंख्य कारखान्यांनी पाळलेले नाही. त्याचे आॅडीटही होत नाही. त्यामुळे अग्नीतांडवाचा धोका सदैव असतोच. रसायनामुळे लागलेली आग विझविण्यासाठी फोम (फेस)चा वापर केला जातो. अनेकदा प्रचंड दाबाखाली साठविलेल्या कार्बनडाय आॅक्साइडचा वापर केला जातो. परंतु या आधुनिक साधनसामुग्रीचा संपूर्ण अभाव या संपूर्ण परिसरातील अग्नीशमन यंत्रणेत आहे.
यात जिल्ह्यातल्या महामार्गावरून रोज लाखो लीटर धोकादायक रसायनांची वाहतूक टँकर करीत असतात. त्यामध्ये गॅस टँकरचाही समावेश असतो. त्यांना अपघात घडून अग्नीकांड उद्धभवत असते. त्यामुळे कंपन्यांच्या सीएसआर निधीतून एमएमआरडीएने सुसज्ज असे अग्नीशमन केंद्र एमआयडीसीच्या माध्यमातून उभारावे, हाच एक इलाज तज्ज्ञांनी सुचविला आहे. तसेच येथील सुरक्षात्मक आॅडीट करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करा नाहीतर कारखाने बंद करा असे धोरण राबवायला हवे, तरच ही अग्नीतांडवावर मात करता येईल, असे तज्ज्ञांनी सुचविले आहे.

एमएमआरडीए सिडकोवर भार

जिल्ह्यातील अग्नीशमन यंत्रणा अधिक प्रभावी कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने पालकमंत्र्या सोबत बैठका घेण्यात आल्या असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत अशी, माहिती पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी लोकमतला दिली. एकंदरीतच गुरुवारी रात्री बोईसरमधील अग्नीकांड पाहता स्वतंत्र अशी अग्नीशमन यंत्रणा उभारण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी एम.एम.आर.डी.ए. आणि जिल्ह्याचे नवे मुख्यालय उभारणाºया सिडकोनेच पुढाकार घेणे आवश्यक आहे.

Web Title: When is the well equipped fire extinguisher in Palghar district?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.