मेढे पुलाचे काम केव्हा सुरू होणार; नारळ वाढवून झाले वर्ष, नागरिकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 12:45 AM2020-02-05T00:45:55+5:302020-02-05T00:46:14+5:30
कुठे अडले घोडे?
पारोळ : तानसा नदीवरील मेढे पुलाच्या कामाचा नारळ गेल्यावर्षी वाढवला असतानाही अद्याप काम सुरू झालेले नाही. यंदा तरी कामाचा मुहूर्त लागेल का, हे पुलाचे काम केव्हा सुरू होणार, असे एक ना अनेक प्रश्न येथील नागरिकांना पडले आहेत.
मेढे ते मेढे फाटा दरम्यान तानसा नदीवरील या पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी पावसाळ्यात तो पाण्याखाली जातो. त्यामुळे पलीकडे असलेल्या आडणे, आंबोडे, मेढे, वडघर, कळभोन, लेंडी या गावांचा संपर्क तुटतो. दोन तीन दिवस या पुलावर पाणी असल्याने येथील नागरिकांचे मोठे हाल होतात. मुलांना शाळेतही जाता येत नाही.
एवढेच नव्हे तर पूल पाण्याखाली गेल्यानंतर उपचारासाठी दवाखान्यात नेता न आल्याने अनेकांचे जीवही गेले आहेत. यामुळे या पुलाची उंची वाढवण्याची मागणी येथील नागरिकांनी केली. पण या पुलाची उंची वाढवण्याऐवजी येथे नवीन पूल मंजूर करण्यात आला. गेल्या सरकारमधील पालकमंत्र्यांच्या हस्ते या कामाचा नारळ वाढवण्यात आला. पण, काम सुरू झालेले नाही.
पूल पाण्याखाली जात असल्याने पावसाळ्यात आम्हाला मोठा त्रास सहन करावा लागतो. पण, येथे आता नवीन पूल होणार आणि आमची समस्या सुटणार असे वाटत असतानाच अजूनही कामाचा शुभारंभ होत नसल्याने पुलाच्या कामाबाबत शंका निर्माण झाली आहे.
- प्रसाद पाटील, नागरीक
तानसा नदीवरील नवीन पूल मंजूर झाला असून पुलाचा आराखडा तयार होत असल्याने कामाला उशीर होत आहे. पण पुढील महिन्यात पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे. यंदा पुलाचे खांब उभे करण्याचा प्रयत्न करू.
- पी. चव्हाण, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग