विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 01:25 AM2017-07-26T01:25:11+5:302017-07-26T01:25:14+5:30
शाळा सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांना गणवेश देण्याऐवजी त्याचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. या विद्यार्थ्यांची खाती नसल्याने गणेवशही नाही आणि पैसेही नाही अशी स्थिती ओढावली आहे.
जव्हार : शाळा सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांना गणवेश देण्याऐवजी त्याचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. या विद्यार्थ्यांची खाती नसल्याने गणेवशही नाही आणि पैसेही नाही अशी स्थिती ओढावली आहे.
या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २४५ शाळा असून त्यात १३ हजार ३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची बँकेत खाती उघडायची झाल्यास कोणतीही बँक इतके फॉर्म उपलब्ध करून देणार नाही. या प्रक्रियेसाठी काही महिने जातील. त्यामुळे विद्यार्थांना शालेय गणवेश वेळेत मिळणार नाही. तसेच जिल्हा परिषद विद्यार्थ्यांच्या पालकांची शिष्यवृत्तीसाठी स्वतंत्र्य खाती असतांना, आता पुन्हा शालेय गणवेशाचे प्रत्येक मुलांचे स्वतंत्र खाते कशासाठी? असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे.
जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांसाठी गणवेश शाळा व्यवस्थापन समिती दरवर्षी खरेदी करीत होती. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थांना प्रत्येकी दोन गणवेश जुलै अखेर मिळत होते. परंतु यावर्षी जिल्हा परिषदेने प्रत्येक विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडून त्यांच्या खात्यावर शाळेने पैसे जमा करावेत असा आदेश दिला. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांत शिक्षण घेणा-या विद्यार्थी व पालकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. त्यामुळे जि. प. विद्यार्थांना शालेय गणवेश मिळणार तरी कधी? अशी समस्या निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषद शालेय विद्यार्थ्यांचे दोन गणवेशाचे पैसे दरवर्षी शाळेच्या कमेटीच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत होते. मात्र यावर्षी फक्त एकाच गणवेशाचे पैसे जमा झालेले आहेत. दरवर्षी सर्व विद्यार्थ्यांचे गणवेश एकत्र शिवल्यामुळे त्यात एकसूत्रीपणा असायचा. आता प्रत्येक विद्यार्थी आणि पालक कोठून कपडे घेणार? किंवा शिलाई कोठे करणार? का कपडे रेडिमेड घेणार यावर नियंत्रण कसे ठेवणार? वेळेवर गणवेश खरेदी न केल्यास जबाबदार कोणाला धरणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.