पालघरच्या वाहतूककोंडीवर उपाय सापडणार तरी कधी?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 09:42 AM2024-01-15T09:42:45+5:302024-01-15T10:15:09+5:30
रेल्वे स्थानक परिसर वगळता शहरात कुठेही पार्किंग व्यवस्था नाही
पालघर : पालघर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला रेल्वेने नेमलेल्या ठेकेदाराच्या पे अँड पार्किंग व्यवस्थेत फक्त ४०० मोटारसायकली पार्क करण्याची क्षमता आहे. याशिवाय अन्य कुठलीही पार्किंगची व्यवस्था शहरात नाही. या रेल्वे स्थानकातून दररोज ४० ते ४५ हजार प्रवासी ये-जा करीत असतात. त्यांच्या वाहतुकीसाठी रिक्षा, कॅबसोबतच प्रवाशांच्या हजारो मोटारसायकली रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूला मिळेल त्या जागेत पार्क करतात. त्यामुळे पालघरमधील वाहतूककोंडीच्या प्रश्नावर मागील १२ ते १५ वर्षांपासून तोडगा निघालेला नाही.
पालघरच्या विकास आराखड्यात वाहनतळासाठी जागा राखीव ठेवण्यात आली असली तरी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात नगर परिषदेला आजही यश आलेले नाही. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेसह अन्य सुमारे ६०च्या वर विविध विभागांची कार्यालये सुरू झाल्याने पालघर शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. त्याचा ताण प्रशासनावर पडू लागला आहे.
मार्गाचे रुंदीकरणाचे काम अनेक
वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे शहरातील सर्वांत जास्त वाहतूककोंडी याच रस्त्यावर होत आहे. याच मार्गावरील रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूने मोटारसायकली पार्क करून ठेवलेल्या असतात. त्याच रस्त्यावर तीनचाकी रिक्षांचे बेकायदेशीर उभे राहिलेले रिक्षा स्टँड वाहतूककोंडीस प्रमुख कारण ठरत आहे.
आजपर्यंत ५० बैठका
पालघर शहराचा वाहतूककोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी आजपर्यंत ५० बैठका पार पडल्यानंतर त्यातून पी १-पी २, एकमार्गी वाहतूक, अवजड वाहनांची वाहतूक, वेळ आदी डझनभर उपाययोजनांचा कालावधी एखाद महिन्याच्या पुढे जाऊ शकलेला नाही. त्यामुळे वाहतूककोंडीच्या जटिल समस्येवर आजपर्यंत ठोस उपाययोजना आखण्यात अजूनही यश मिळालेले नाही.
इमारतींमध्ये पार्किंग व्यवस्था नाही
शहरात उभ्या राहिलेल्या अनेक इमारतींना आपली स्वतःची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नसल्याने त्याचा परिणामही वाहतूककोंडीत भर टाकीत असून, रस्त्याच्या बाजूला नागरिकांना चालण्यासाठी बनविलेले पदपथ दुकानदारांनी गिळंकृत केले आहेत. परिणामी नागरिकांना धोकादायकरीत्या रस्त्यावरून पायी चालत जावे लागत आहे.