कोणता झेंडा घेऊ हाती...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 02:46 AM2018-05-26T02:46:19+5:302018-05-26T02:46:19+5:30
मतदारांची लागणार कसोटी : गावित अनुभवी, वनगांना सहानुभूती तर जाधवांकडे शहरी मतदार
पालघर : लोकसभा पोट निवडणुकीतील विजयी उमेदवाराला जेमतेम वर्षभराचा कालावधी मिळणार असल्याने कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्यास आपल्या समस्या सुटू शकतील याबाबतीत मतदारांमध्ये संभ्रम आहे. पालघर पोट निवडणुकीत भाजपकडून राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा, काँग्रेसकडून दामू शिंगडा तर बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव या प्रमुख पक्षासह सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून भाजप-शिवसेना-बविआ या तीन पक्षांमध्ये विजयासाठी चढाओढ सुरु आहे. एवढे होऊनही निवडूण येणाऱ्या उमेदवाराला अवघा एक वर्षाचा कार्यकाळ मिळणार असल्याने आपली किती कामे होतील असा जनतेचा प्रश्न असल्याने ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ अशी काहीशी अवस्था त्यांची आहे.
केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असून जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, तारापूर औद्ययोगिक मंडळातील सीईटीपी, घनकचरा प्रश्न, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते, रेल्वे प्रश्न, विना अनुदानित शाळांचा प्रश्न, किनारपट्टीवरील तुटलेले धूप प्रतिबंधक बंधारे, डिझेलचा परतावा, वसई-उत्तन व पालघर-डहाणू दरम्यान मच्छिमारांचा हद्दीचा वाद, दलालांकडून मच्छिमारांची होणारी लूट,अद्यायावत रु ग्णालयाची कमतरता आदी प्रश्न महत्वाचे असल्याने अनुभवी आणि सत्ता पक्षात असणारा व्यक्ती या प्रश्नांना न्याय देईल की नवखा व्यक्ती असा प्रश्नही चर्चेचा बनला आहे.
राजेंद्र गावित सत्ताधारी पक्षाचे उमेदवार असून बविआचे उमेदवार बळीराम जाधव याना केंद्रातील कामकाजाचा अनुभव असला तरी बविआ पक्षाला आपल्या मर्यादा असल्याने वरील प्रश्नांवर उपाययोजना आखण्याबाबत वर्षभराचा कालावधी त्यांना अपुरा पडू शकतो. दुसरीकडे शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांना केंद्रातील कामकाजाचा तसूभरही अनुभव नसल्याने त्यांना हे कामकाज शिकून घेण्यातच मोठा कालावधी निघून जाणार असे चित्र आहे. त्यामुळे आपले प्रलंबित असलेले या प्रश्नांवर वर्षाभरात त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणारा उमेदवार निवडून द्यावा असा कल मतदारांत वाढत आहे.
ही आहे जमेची बाजू
गावितांची काम करण्याची क्षमता तसेच त्यांनी जिल्ह्यात केलेली विकासकामे ही त्यांची जमेची बाजू आहेच. त्याचबरोबरीने समाजाशी त्यांची असलेली नाळ खूप मोठी असून त्याचा फायदा मतदारांकडून त्याना होऊ शकतो. तर दिवंगत चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना सहानुभूतीच्या लाटेचा फायदा मिळू शकतो. तसेच बविवाचे उमेदवार अनुभवि असून त्यांना शहरी भागातून पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.