पांढऱ्या कांद्याने आणले ‘त्या’ शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 02:57 AM2021-03-24T02:57:16+5:302021-03-24T02:57:42+5:30

आम्ही ८ एकर जागेत ८ किलो कांद्याच्या बियाणांची लागवड केली. आमच्या मुलांनी अन्य ठिकाणी केलेल्या पैशांची गुंतवणूक याच कांद्यात केली

The white onion brought tears to the eyes of ‘those’ farmers; Outbreaks of fungal diseases | पांढऱ्या कांद्याने आणले ‘त्या’ शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

पांढऱ्या कांद्याने आणले ‘त्या’ शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

Next

राहुल वाडेकर

विक्रमगड : पांढऱ्या कांद्याचे आगार म्हणून ओळख असलेल्या म्हसरोली येथील शेतकऱ्यांच्या डोळ्यात याच कांद्याने अक्षरशः पाणी आणले आहे. कांद्याच्या लागवडीला लागलेल्या रोगाने आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. या रोगाबाबत कृषी विभागाकडून मार्गदर्शन केले जात आहे.

म्हसरोली गावात सुमारे १०० एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली जात आहे. सफेद कांद्याला एकरी ३० ते ४० हजार खर्च येत असून यातून ५० ते ६० हजार रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळते. येथील पांढरा कांदा उत्तम दर्जाचा असल्याने त्याला मोठी मागणी असते. मागील वर्षी ऐन हंगामात कोरोनाचा कहर वाढल्याने शेतकरी भुईसपाट झाला. मिळेल त्या भावाला कांदा विकून शेतकरी हवालदिल झाला. मात्र, या वर्षी कांद्याला चांगला भाव मिळेल, या आशेवर पुन्हा नव्याने उभारी घेत शेतकऱ्याने जानेवारी महिन्यात कांदा लागवड केली. सातत्याने वातावरणात होणारे बदल यामुळे उद्भवणारी बुरशीजन्य रोगराई कांदा उद्ध्वस्त करीत आहे. यासोबतच येथील शेतकऱ्यांनी लागवड केलेली मिरचीदेखील करपून जात असून,  आजारावर योग्य औषधोपचार होत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. 
दरम्यान, कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मार्गदर्शन केले. भाजीपाल्याचा विमा काढावा, जेणेकरून सुरक्षा कवच मिळेल, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र विमा काढण्यात अडचणी येतात, असे येथील शेतकरी अशोक घरत यांनी  सांगितले.

आम्ही ८ एकर जागेत ८ किलो कांद्याच्या बियाणांची लागवड केली. आमच्या मुलांनी अन्य ठिकाणी केलेल्या पैशांची गुंतवणूक याच कांद्यात केली, मात्र बुरशीमुळे कांदा खराब होत असल्याने आम्हाला मोठे नुकसान सोसवे लागणार आहे.  - रमेश परशुराम घरत, शेतकरी, म्हसरोली

काही शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतात  जाऊन पाहणी करून मार्गदर्शन केले. शेतकरी व कृषी सेवा केंद्रदेखील अनेकदा चुकीची औषधे देतात. त्यामुळे उलट परिणाम दिसून येण्याची शक्यता असते.- आर.यू. इभाड, विक्रमगड तालुका कृषी अधिकारी.

Web Title: The white onion brought tears to the eyes of ‘those’ farmers; Outbreaks of fungal diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.