गटारींच्या झाकणांचे पैसे खाल्ले कुणी? नालासोपाराकरांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:03 PM2019-04-28T23:03:51+5:302019-04-28T23:04:19+5:30
लोकांच्या नागरी समस्येच्या नावावर घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावरून नेहमी चर्चेत राहणाऱ्या वसई विरार शहर महानगरपालिका आता गटारावरील झाकणांमुळे आता पुन्हा चर्चेत आली आहे.
नालासोपारा : लोकांच्या नागरी समस्येच्या नावावर घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावरून नेहमी चर्चेत राहणाऱ्या वसई विरार शहर महानगरपालिका आता गटारावरील झाकणांमुळे आता पुन्हा चर्चेत आली आहे. करोडो रुपये खर्च केले असून शहरातील रस्त्यातील गटारावरील झाकणे गायब असल्याने मनपावर घोटाळा केल्याचा आरोप केला जात आहे. वसई, विरार, नालासोपारा विभागातील छोट्या मोठ्या गल्ली बोळातून जाणाऱ्या रस्त्याच्या किनाºयाला असणाऱ्या गटारावरील झाकण गायब झाल्याने अपघाताला जणू निमंत्रणच दिले जाते आहे. सध्याच्या स्थितीमध्ये गटारांच्या साफसफाई आणि डागडुजी साठी मनपा करोडो रुपये खर्च करत असलेला दावा खोटा ठरत आहे.
मनपाच्या सार्वजनिक बांधकाम अभियंता राजेंद्र लाड यांनी लोकमतला सांगितले आहे की, मनपाच्या ९ प्रभागाअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर दरवर्षी गटारांच्या डागडुजीकरीता आणि नवीन झाकणे बनविण्यासाठी मागील वर्षी अनुक्र मे ४ कोटी आणि २ कोटी खर्च केले होते पण या वर्षी गटारांची डागडुजी करण्यासाठी व नवीन बनविण्यासाठी ५ करोड आणि ढाकणांसाठी ५ करोड रुपयांची तरतूद केली आहे. गटारावरील लोखंडी झाकणे चोरीला जातात म्हणून आता फायबरची झाकणे गटारावर टाकली जात असल्याचेही सांगितले. पण हा मनपा करत असलेला खर्च फक्त कागदावरच दिसत असून वस्तुस्थिती काही वेगळीच असल्याचे दिसून येत वसई विरार मनपा हद्दीमधील गटारावरील शेकडो झाकणे गायब तर काही तुटलेल्या स्थितीत आहे.
मनपा ही सर्व कामे ठेकेदारांमार्फत करून घेते. परंतु ठेकेदार निकृष्ट दर्जाचे सामान आणि झाकणे बसवून मनपाला चुना लावत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून हे लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचेही सांगितले. असाच प्रकार ८ दिवसांपूर्वी वसई गावातील चिमाजी अप्पा मैदानाच्या बाजूला असलेल्या नाल्यावरील झाकण नसल्यामुळे १० वर्षांचा मुलगा नाल्यात पडून गंभीर जखमी झाला होता. मनपा फक्त कागदावर या ठेकेदारांवर कारवाई करते मनपाचे अधिकारी आणि ठेकेदार गटारावरील झाकणांचे पैसे खातात असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
नाल्यावरील झाकणे गायब आणि तुटलेली...
विरार पूर्वेकडील सहकार नगर, फुलपाडा, कातकरी पाडा, चंदनसार रोड तर पश्चिमेकडील गोकुळ टाऊनशीप, बोलींज, एम. बी. इस्टेट, स्टेशन रोड परिसर, नालासोपारा पश्चिमेकडील सोपारा गाव, टाकीपाडा, समेळ पाडा, पांचाळ नगर, श्रीप्रस्था, पूर्वेकडील आचोळे रोड, डॉन गल्ली, मोरेंगाव, ओसवाल नगरी, नगीनदास पाडा, संतोष भवन, तुळींज रोड, विजय नगर, प्रगती नगर, अलकापुरी, श्रीराम नगर, वसई पश्चिमेकडील वसई गाव, माणिकपूर, आनंद नगर, लिंक रोड, वसंत नगरी, कोळीवाडा, भाभोळा नाका अशा अनेक विभागातील अंदाजे पाचशे ते सहाशे झाकणे तुटलेली असून शेकडो झाकणे गायब आहेत.