रस्त्यावरील झाडे कापण्याची जबाबदारी कुणाची?
By admin | Published: July 30, 2015 10:32 PM2015-07-30T22:32:19+5:302015-07-30T22:32:19+5:30
पालघर जिल्ह्यातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या बेसुमार झाडांची कित्येक वर्षांपासून छाटणीच झाली नसल्याने त्यांची अमर्याद वाढ होऊन मोठमोठ्या झाडांच्या फांद्या
डहाणू : पालघर जिल्ह्यातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या बेसुमार झाडांची कित्येक वर्षांपासून छाटणीच झाली नसल्याने त्यांची अमर्याद वाढ होऊन मोठमोठ्या झाडांच्या फांद्या मुख्य रस्त्यावर येत आहेत. वादळ तसेच सोसाट्याच्या वाऱ्याने या फांद्या तुटून नागरिकांचा बळी जातो. अशा दुर्घटना वारंवार होऊनही झाडे छाटण्याची जबाबदारी कोणीच घेत नसल्याने नागरिकांना तसेच वाहनचालकांना पावसाळ्यात बाहेर पडणे भीतिदायक वाटते आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा यासाठी जिल्ह्यात विशेष शासकीय यंत्रणा उभी करण्याची मागणी ग्रामस्थ तसेच वाहनचालकांकडून होत आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर, बोईसर, तलासरी, जव्हार, सूर्यानगर, चारोटी, कासा, वानगाव, धा. डहाणू या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कडेला हजारो झाडे १०० वर्षांपूर्वीपासूनची आहेत. पावसाळ्यात सोसाट्याचा वारा सुटल्यास याचा धोका वाढतो. जून, जुलै महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसात हजारो झाडे तुटून तसेच जमिनीतून उन्मळून मुख्य रस्त्यावर पडल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. शिवाय, डहाणू, मसोली येथे मोटारसायकलने जाणाऱ्या राजेश प्रजापती (४०) यांच्या अंगावर झाड पडून ते जागीच ठार झाले. तर पालघर, शिरगाव येथे जुने झाड कोसळून प्रकाश माळी (५०) या तरुणाचा बळी गेला. अशा अनेक घटना रस्त्यावरील झाडांमुळे घडत असताना प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने नागरिकांना रस्त्यावर चालणेही कठीण आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य रस्त्याला लागून असलेल्या मोठमोठ्या झाडांच्या फांद्या सडून, कुजून, अचानक तुटून विजेच्या तारांवर पडून अनेक वेळा मोठा अपघात होता-होता वाचला आहे. तरी, पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला असलेली झाडे कापण्याची जबाबदारी सक्षम शासकीय यंत्रणेवर सोपविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (वार्ताहर)