सिग्नल यंत्रणांचा वाली कोण ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:29 PM2019-06-03T23:29:26+5:302019-06-03T23:29:31+5:30
पालिका व वाहतूक पोलीस अधिकारी हे एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. तसेच ठेकेदारांवर देखील कारवाई होत नसल्याने ते ही मोकाट आहेत. यातून जनतेच्या पैैशाची नासाडी मात्र वर्षानुवर्षे सुरू आहे.
विरार : वसई विरार शहरात नवीन सिग्नल बसवण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. मात्र, एका बाजूला पालिकेतर्फे सिग्नल बांधणाऱ्या ठेकेदारांवर अद्यापही कारवाई करण्यात येत नाही. तर दुसरीकडे वाहतूक विभाग पोलीस याकडे दुर्लक्ष करीत आहेत. खराब सिग्नल यंत्रणांच्या दुरुस्तीबाबत पालिका व वाहतूक पोलीस अधिकारी हे जबाबदारी घेत नसल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होत आहे.
वसईमध्ये नवीन सिग्नल बसविण्यासाठी पालिका प्रयत्न करत आहे. तर यासाठी पालिकेने काम देखील सुरु केले आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून आधीपासून असलेल्या सिग्नल यंत्रणांमध्ये बिघाड होत असतांना अजूनही त्यात सुधारणा करण्यात आलेली नाही.
महापालिका व वाहतूक पोलीस अधिकारी हे चौकशी करण्यात दिवस वाया घालवत असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्याच प्रमाणे सिग्नल बांधण्याचे काम महापालिकेचे होते तर यासाठी पालिकेतर्फे ठेकेदार नेमण्यात आले होते. तर ठेकेदारांच्या निकृष्ट कामामुळे सिग्नल यंत्रणांमध्ये सतत बिघाड होत आहे. तरी देखील ठेकेदरांवर अद्यापही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच सिग्नल यंत्रणा महापालिकेने बांधली असली तरी याची देखरेख वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांकडून होत असते, परंतु महापालिका व वाहतूक पोलीस अधिकारी हे एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. यामुळे यंत्रणे दुरु स्त होण्यास विलंब होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
वसई तालुक्यात लावण्यात आलेले सिग्नल मधेच बंद पडते आहे. तर यामुळे वाहन चालक गडबडून थांबतात व यामुळे वाहतूक कोंडी व अपघात होण्याची शक्यता वाढत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून विरारमधील जकात नाक्यावरील सिग्नल बंद पडत होता. मात्र आता नालासोपारा, आर.जे. नगर, मनवेल पाडा याठिकाणी देखील सिग्नल बंद पडत असून त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. वाहतूक पोलीस अधिकाºयांनी सिग्नल यंत्रणात बिघाड होत असल्याने त्याची तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अद्यापही त्याची तपासणी देखील न झाल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
सिग्नल यंत्रणा महापालिकेच्या हातात आहेत. त्याच्या दुरुस्तीचे काम ती बघते. तरी आम्ही लवकरच त्याची दुरुस्ती करू.’’ - संपत पाटील, वाहतूक विभाग पोलीस अधिकारी,
सिग्नल महापालिकेतर्फे बांधण्यात आले तरी त्याची देखरेख वाहतूक विभागाने करणे गरजेचे आहे. याची माहिती घेऊन लगेच काम सुरु करू.’’ - बी.जी.पवार, आयुक्त