डहाणू पंचायत समिती सभापती पदावर कोण विराजमान होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 10:49 PM2020-01-13T22:49:34+5:302020-01-13T22:50:21+5:30
महाविकास आघाडीची शक्यता : राष्ट्रवादी मोठा पक्ष, पण एकहाती सत्ता नाही
शौकत शेख
डहाणू : पालघर जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच झाल्या. डहाणू पंचायत समितीत ९ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, त्यांना शिवसेना किंवा भाजपची साथ घेतल्याशिवाय, पंचायत समितीवर सत्ता स्थापन करता येणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्याप्रमाणे जिल्ह्यात आणि तालुक्यातही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आणि काँग्रेसशी महाविकास आघाडीचे संकेत आहेत.
डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १३ जागांसाठी, तर पंचायत समितीच्या २६ जागांसाठी अटीतटीची निवडणूक झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, माकप, मनसे, या सर्व राजकीय पक्षांनी कोणाशीही युती, आघाडी न करता स्वतंत्रपणे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते.
डहाणू पंचायत समितीच्या २६ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला ९, शिवसेना ८, भाजप ७ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला २, जागा मिळाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
राज्याप्रमाणेच डहाणू पंचायत समितीवरही सत्तास्थापनेसाठी महाविकास आघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत. डहाणू पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे सर्वाधिक ९ उमेदवार निवडून आल्याने, सभापतीपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर उपसभापतीपद शिवसेनेकडे जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
डहाणू पंचायत समितीचे सभापती पद हे अनुसूचित जमाती महिलेसाठी आरक्षित असून, उपसभापती पद हे सर्वसाधारण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सभापतीपदासाठी पिंटी रमेश बोरसा, स्नेहलता सिताराम सातवी, आणि अरुणा सुनील भावर, या तीन अनुसूचित जमातीतील महिलांचा पर्याय उपलब्ध आहे.
डहाणू पंचायत समितीवर सत्ता स्थापनेसाठी राज्याप्रमाणे महाविकास आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याप्रमाणे हालचाली सुरू झाल्या आहेत, वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे योग्य तो निर्णय घेतला जाईल. -राजेश पारेख, राष्ट्रवादी काँग्रेस, पालघर, विधानसभा मतदारसंघ, अध्यक्ष