बाजारात भाजीपाला तोलूनमापून घेणारा ग्राहक पेट्रोल पंपावर मात्र दुर्लक्ष का करतो?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 02:50 AM2021-03-22T02:50:36+5:302021-03-22T02:51:03+5:30
इंधनाचे दर शंभरीनजीक, डहाणू तालुक्यात ११ पेट्रोल पंप असून वर्षभरात एकही तक्रार ग्राहकांनी नोंदवलेली नाही
अनिरुद्ध पाटील
बोर्डी : पालघर जिल्ह्यामध्ये पेट्रोलसहडिझेलचा दर सातत्याने वाढत असून इंधनाचे दर शंभरीकडे पोहोचले आहेत, हे आकडे शंभरीपार कधीही जाऊ शकतील, मात्र भाजीपाला खरेदी करताना, तो तोलूनमापून घेणारा ग्राहक पेट्रोल पंपावर गेल्यावर मात्र दुर्लक्ष करताना दिसत आहे.
डहाणू तालुक्यात ११ पेट्रोल पंप असून वर्षभरात एकही तक्रार ग्राहकांनी नोंदवलेली नाही. डहाणू तालुक्यात नगरपालिका क्षेत्रात तीन, आंबोलीत चार, चारोटी, वाणगाव, घोलवड आणि अन्य एक असे एकूण ११ पेट्रोल पंप आहेत. महाराष्ट्रात इंधनाच्या दरांनी नव्वदी पार केली असून दिवसेंदिवस हा आकडा शंभरीच्या दिशेने पुढे सरकत आहे. लवकरच लीटरमागे तीन अंकी दर मोजावे लागतील ही शक्यता नाकारता येत नाही, मात्र असे असताना बाजारात भाजीपाला तोलूनमापून घेणारा ग्राहक पेट्रोल पंपावर दुर्लक्ष करताना दिसत आहे. डहाणू तालुक्यात मागील एका वर्षात अकरा पेट्रोल पंपांवर एकाही ग्राहकाने इंधन भरताना तक्रारच केली नसल्याची बाब उघड झाली आहे. याबाबत वैधमापन विभागानेच ही माहिती दिली आहे. प्रत्येक पेट्रोल पंपांवर भेट देऊन नियमांचे काटेकोर पालन होते, याबाबत नियमित तपासणी केली जात असल्याची माहिती या विभागाकडून देण्यात आली.
शेजारी राज्यात इंधन नऊ रुपयांनी कमी
डहाणू तालुका महाराष्ट्र-गुजरात सीमाभागात असून लगतच्या गुजरात आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांत मात्र इंधनाचे दर सुमारे नऊ रुपयांनी कमी आहेत. उंबरगाव आणि वापी येथील गुजरातच्या औद्योगिक वसाहतीत जाणारा तालुक्यातील कामगारवर्ग आपल्या वाहनांमध्ये तेथील पंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्याला प्राधान्य देतो. असे असतानाही डहाणू तालुक्यातील ११ पेट्रोल पंपांवर मात्र दरदिवशी १० लक्ष ८ हजार ५०० लीटर डिझेलची, तर २३ हजार ५५० लीटर पेट्रोलची विक्री होत असते. परंतु एकाही पेट्रोल पंपावर वर्षभरात एकही तक्रार आलेली नाही, असे सांगण्यात आले. शून्य तक्रार असणे म्हणजेच ग्राहकांचे इंधन भरताना होणारे दुर्लक्ष याकडे लक्ष वेधले जात आहे.
डहाणू तालुक्यात विविध भागात ११ पेट्रोल पंप आहेत. या विभागातर्फे प्रत्येक पंपांवर भेट देऊन, नियमांची काटेकोर अंमलबाजवणी केली जाते हे तपासले जाते. मागील वर्षभराचा विचार केल्यास, ग्राहकांकडून एकही तक्रार प्राप्त झालेली नाही. - विनोद वाघदे, पुरवठा अधिकारी, डहाणू
पंपावर पेट्रोल-डिझेल टाकताना घ्या काळजी
पेट्रोल पंपावर गेल्यावर पेट्रोल आणि डिझेल टाकताना रीडिंग झिरो आहे हे सर्वात आधी पाहावे. तेल टाकत असताना काही हातचलाखी केली जात आहे का तेही पाहावे. तेथील कर्मचारी तेल टाकताना आपले लक्ष इतरत्र विचलित होऊ देऊ नये. काही शंका असल्यास प्रत्येक पेट्रोल पंपावर पाच लीटरचे प्रमाणित माप उपलब्ध असते, त्याद्वारे खात्री करावी.