बहुजन चेहरा असेल वसई - विरारचा आगामी महापौर ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 11:43 PM2019-08-01T23:43:31+5:302019-08-01T23:43:51+5:30
५ आॅगस्ट रोजी महासभा : नव्या महापौरनिवडीचे सर्व हक्क हितेंद्र ठाकूर यांच्याकडे
वसई : वसई - विरारचा आगामी महापौर म्हणून बहुजन चेहऱ्याला संधी मिळाली तरी आश्चर्य वाटू नये, अशी परिस्थिती सध्या शहरात आहे. या महापौर निवडीचे सर्व हक्क हे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आ. हितेंद्र ठाकूर यांच्याकडे असून लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका आणि आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच असा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
वसई - विरार महापालिकेचे मावळते महापौर रुपेश जाधव यांनी गेल्या आठवड्यात महापौरपदाचा राजीनामा पक्षनेते आ. हितेंद्र ठाकूर आणि आयुक्त बी.जी.पवार यांच्याकडे सुपूर्द केला. विशेष म्हणजे अजूनही राजीनामा दिलेले महापौर जाधव हे आजही तांत्रिकदृष्ट्या महापौर असले तरी प्रत्यक्षात हा एकूणच कारभार कायद्यानुसार आयुक्तांनी उपमहापौर प्रकाश रोड्रिक्स यांच्याकडे सोपवला आहे.
महापौरांनी दिलेला राजीनामा रीतसर मंजूर करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने ५ आॅगस्ट रोजी एका विशेष महासभेचे आयोजन केल्याची माहिती पालिका आयुक्त बी.जी. पवार यांनी लोकमतला दिली. या महासभेत महापौर जाधव यांनी दिलेला राजीनामा मंजूर करून तो ६ आॅगस्ट रोजी आयुक्तांच्या माध्यमातून विभागीय (महसूल) कोकण आयुक्त यांच्याकडे सोपविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
महापौरपदासाठी वसई - विरार महापालिकेतील काही दिग्गजांची नावे चर्चेत आहेत. तरीही या निवडीबाबत आ. हितेंद्र ठाकूर हे अंतिम निर्णय घेतील. ५ आणि ६ आॅगस्टला महापौर निवडी संदर्भात प्रक्रिया होणार असून आॅगस्ट महिन्याच्या दुसºया आठवड्यात नव्या महापौरांची निवड अपेक्षित आहे.
दरम्यान, वसई - विरारचा नवा महापौर निवडताना यावेळी आ. ठाकूर यांना आगामी विधानसभा निवडणूक आणि पुढील वर्षीची महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सर्वसमावेशक असा बहुजन चेहरा महापौर म्हणून द्यावा लागेल. यासाठी समाजातील अनेक समाज धुरिणांना यात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करणे अथवा व्यापक समाजाला न्याय देण्याचा एक प्रयत्न त्यांना करावा लागणार आहे. याबाबत ठाकूर यांची प्रतिक्रि या जाणून घेण्यासाठी संपर्क केला मात्र तो झाला नाही.
पालिका आयुक्त म्हणून माझ्याकडे महापौरांनी राजीनामा दिला असून आता पुढील महिन्यात होणाºया महासभेत त्याला रितसर मंजुरी मिळेल. मात्र, तोपर्यंत महापौर पदाचा कार्यभार उपमहापौर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. महासभेची मंजुरी मिळाली की शासनातर्फे पीठासीन अधिकारी नियुक्त होऊन महापौर पदासाठी निवडणूक होईल, त्यामध्ये नवा महापौर ठरवला जाईल.
-बी.जी.पवार, आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्यालय