सत्तेसाठी बविआसोबत करणार हातमिळवणी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 11:27 PM2019-12-19T23:27:25+5:302019-12-19T23:27:29+5:30
सत्ता टिकवण्याचे भाजपसमोर आव्हान : युतीतील वादाचे पडसाद उमटणार
हितेन नाईक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : देशात असलेली मोदी लाट आणि युतीच्या ताकदीवर पालघर जिल्हा परिषदेवर सत्ता प्रस्थापित करणाऱ्या भाजपची आता ही सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी मोठीच कसोटी लागणार आहे. ओसरलेल्या मोदी लाटेबरोबरच युतीमधील त्यांचा भागीदार असलेल्या शिवसेना पक्षानेही त्यांची साथ सोडल्याने सत्ता स्थापनेची त्यांची वाट बिकट बनली आहे. अशा वेळी पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी भाजपने बविआशी हातमिळवणी केल्याची माहिती पुढे येत आहे.
पालघर जिल्हा परिषदेत भाजप २१, शिवसेना १५, बविआ १०, राष्ट्रवादी ४, माकप ५, काँग्रेस १ आणि अपक्ष १ असे एकूण ५७ जागांचे बलाबल असून सेनेसह बहुजन विकास आघाडीने दिलेल्या पाठिंब्यामुळे भाजपने आपली पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण केली. जिल्हा निर्मितीनंतर जानेवारी २०१५ मध्ये झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, बविआ आणि इतर पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. त्यावेळी कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत न मिळाल्याने सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप पक्ष कोणाशी तडजोड करून सत्ता स्थापन करेल ह्या बाबत संदिग्धता होती.
राज्यातील परिस्थिती पाहता राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा जाहीर करीत सेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. तर बविआनेही सत्ता स्थापनेसाठी भाजपला मदतीची आवश्यकता असल्याने बिनशर्त पाठिंबा देण्याचे जाहीर करीत आपला राजकीय शत्रू असलेल्या शिवसेनेची गोची करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी आपण बविआशी कोणत्याही परिस्थितीत युती करणार नसल्याचे सेनेने जाहीर केले होते. आणि भाजपने बविआशी हातमिळवणी केल्यास सेना अशा युतीमध्ये सहभागी होणार नसल्याचे सेनेने स्पष्ट केले होते. सेनेच्या ह्या भूमिकेमुळे भाजपची मात्र कोंडी झाली होती. युतीतील आपल्या सहकारी पक्षाला नाकारून बविआशी आघाडी करून सत्ता स्थापन केल्यास मतदारांमध्ये वेगळा संदेश जाईल, अशी भीती भाजपला वाटत असल्याने शेवटी भाजपने सेनेशी युती करीत सत्ता स्थापन केली. अध्यक्षा म्हणून भाजपच्या सुरेखा थेतले तर उपाध्यक्षपदी सेनेच्या सचिन पाटील यांची निवड करण्यात आली होती. सध्या राज्यातील राजकीय चित्र बदलले असून भाजप-शिवसेनेची अभेद्य युती दुभंगली असून सेनेने राष्ट्रवादी व काँग्रेसशी महाआघाडी तयार करून सत्ता स्थापन केली आहे.
‘रात्रीस खेळ’ : छुप्या डावाला सुरुवात
च्भाजपनेही जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी आपल्या छुप्या डावाला सुरुवात केली असून सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप आणि बहुजन विकास आघाडी एकत्र लढण्याच्या हालचालींसंदर्भात ‘रात्रीस खेळ’ सुरू झाले आहेत.
च्युतीतील आपल्या नैसर्गिक मित्राला बाजूला करत शिवसेनेने मुख्यमंत्रीपद मिळविल्याने राज्यात युतीतील दोन्ही पक्षात तेढ निर्माण झाली असून त्याचे पडसाद आतापासूनत पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत उमटू लागले आहेत.