ठाण्याच्या राजकारणात भाजपचे ‘डाव’खरे होतील?; शहराध्यक्षपदी निरंजन डावखरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 11:38 PM2020-01-17T23:38:34+5:302020-01-18T07:14:10+5:30

ठामपा निवडणुकीत होणार शिंदे-आव्हाड यांच्याशी सामना

Will the BJP 'left' in Thane politics? | ठाण्याच्या राजकारणात भाजपचे ‘डाव’खरे होतील?; शहराध्यक्षपदी निरंजन डावखरे

ठाण्याच्या राजकारणात भाजपचे ‘डाव’खरे होतील?; शहराध्यक्षपदी निरंजन डावखरे

Next

ठाणे : ठाणे भाजप शहराध्यक्षपदी आ. निरंजन डावखरे यांची नियुक्ती झाल्याने ठाण्यातील राजकारणातील वसंत डावखरे यांच्या निधनानंतर दुर्लक्षित झालेला ‘डावखरे फॅक्टर’ पुन्हा चर्चेत आला आहे. येत्या ठाणे महापालिका निवडणुकीत मंत्री एकनाथ शिंदे व मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या महाविकास आघाडीचा सामना निरंजन यांना करावा लागणार आहे.

ठाण्याच्या राजकारणात स्व. आनंद दिघे यांचे स्थान जेवढे महत्त्वाचे राहिले आहे, तेवढेच स्व. वसंत डावखरे यांचे स्थान बहुचर्चित राहिले आहे. अगोदर काँग्रेस व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहिलेल्या डावखरे यांची ‘मातोश्री’शी जवळीक होती. त्यामुळे अनेकदा थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आपले ‘डाव’खरे करून घेण्यात वसंतराव यशस्वी झाल्याचे अनेकदा पाहायला मिळाले. वसंत डावखरे हे दीर्घकाळ विधान परिषदेचे उपसभापती होते. तेव्हा त्यांचा ठाण्यातील राजकारणावर वरचष्मा होता. या पदावरील त्यांची मुदत संपुष्टात आल्यानंतर व अखेरचे काही दिवस त्यांची प्रकृती खराब असल्याने ठाण्याच्या राजकारणातील डावखरेंचा दबदबा कमी झाला होता.

ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांच्याजागी आता कोकण पदवीधर मतदारसंघाचे आ. निरंजन डावखरे यांची नियुक्ती केलेली आहे. निरंजन यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपत प्रवेश केला आहे. राज्यात सर्वाधिक जागा मिळवूनही सत्ता स्थापन करण्यात भाजपला अपयश आले. त्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या नियुक्त्यांमध्ये निरंजन यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ही आव्हानात्मक असणार आहे. ठाणे महापालिका निवडणूक महाविकास आघाडी लढवणार असेल, तर कदाचित शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढण्याची शक्यता आहे. अशावेळी राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या या दोन मातब्बर मंत्र्यांचा सामना डावखरे यांना करावा लागेल.

ठामपावर भाजपचा झेंडा फडकविणार : आमदार डावखरे
आगामी काळात ठाणे शहरातील संघटनात्मक बांधणीवर भर दिला जाईल. त्याचबरोबर २०२२ साली होणाºया निवडणुकीत महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवू, असा दावा अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आ. निरंजन डावखरे यांनी केला. महापालिका निवडणुकीला अजून सव्वादोन वर्षांचा अवधी आहे. त्यापूर्वी भाजपची संघटना कानाकोपऱ्यांत पोहोचवण्यास प्राधान्य दिले जाईल. सध्या ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचा आमदार आहे. अन्य मतदारसंघांत विरोधी पक्षांचे आमदार आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या आमदारांना भाजपची मोलाची साथ मिळाली होती.

Web Title: Will the BJP 'left' in Thane politics?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.