वसईतील ‘हरित पट्टा’ उद्ध्वस्त होणार? घनकचरा, सांडपाणी प्रकल्प अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 12:25 AM2020-01-22T00:25:19+5:302020-01-22T00:29:00+5:30

पालिकेचा भोंगळपणा आणि सत्ताधाऱ्यांची उदासीनता यामुळे लवकरच हरित वसई प्रदूषित आणि धोकादायक शहर बनेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे

Will the 'green belt' collapse in Vasai? Solid waste, wastewater projects fail | वसईतील ‘हरित पट्टा’ उद्ध्वस्त होणार? घनकचरा, सांडपाणी प्रकल्प अपयशी

वसईतील ‘हरित पट्टा’ उद्ध्वस्त होणार? घनकचरा, सांडपाणी प्रकल्प अपयशी

Next

- मंगेश कराळे

नालासोपारा - निसर्गाने बहरलेली, समृद्ध वनराईने सजलेली अशी वसईची ओळख आहे. मात्र गेल्या काही वर्षात वसईचा हा ‘हरित पट्टा’ उद्ध्वस्त होत चालला आहे. पालिकेचा गलथानपणा आणि सत्ताधाऱ्यांची उदासीनता यामुळे लवकरच हरित वसई प्रदूषित आणि धोकादायक शहर बनेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

वसईच्या डम्पिंग ग्राऊंडचे घनकचरा व्यवस्थापन होत नसले तरी प्रदूषण मंडळ पालिकेला पाठीशी घालत आहे. दुसरीकडे दरदिवशी कोट्यवधी लिटर सांडपाणी प्रक्रिया न करताच समुद्रात सोडले जात आहे. सर्वसामान्यांशी निगडित असलेला पर्यावरण अहवाल मागील तीन वर्षांपासून तयार झालेला नाही. यामुळे हरित वसईची वाटचाल बकाल वसईच्या दिशेने सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी केला आहे.

वसई-विरार महापालिकेचे गोखिवरे येथे १९ हेक्टर जागेवर डम्पिंग ग्राऊंड आहे. २०१४ मध्ये ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी घनकचरा प्रकल्पासाठी ५० एकर जागा नि:शुल्क दिली होती. आज महापालिकेच्या स्थापनेला १० वर्ष पूर्ण होऊनही गोखिवरे येथील घनकचरा प्रकल्पात निरंक (०%) ही प्रक्रिया केली जात नाही. सध्या वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात दररोज ८०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिकेने ४१३ कोटींचा प्रकल्प आखला होता. मात्र त्याची अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही. या कचºयाचे वर्गीकरण होत नाही, मिथेन गॅस, जैवइंधन (बायोगॅस) तसेच खत तयार केले जात नाही. परिणामी या कचºयाचे डोंगर दिवसेंदिवस वाढत आहेत. कचºयाच्या दुर्गंधीमुळे परिसरातील अनेक भागात साथीचे आजार पसरले असून आरोग्याच्या भीषण समस्या निर्माण झालेल्या आहेत. कचरा नष्ट करण्यासाठी आगी लावल्या जातात, मात्र त्या धुराने श्वसनाचे अनेक विकार जडले आहेत. कचरा कुजल्यानेही असह्य दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

पालिका घनकचरा व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरत असतान दुसरीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाकडून खोटा अहवाल सादर करून पालिकेची पाठराखण केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दरवर्षी नागरी घनकचरा व्यवस्थापन अहवाल सादर करते. मंडळाच्या २०१८ च्या अहवालानुसार महापालिका क्षेत्रात तर दरदिवशी ६३० मेट्रिक टन कचºयाची निर्मिती होते. मात्र सध्या ८०० मेट्रिक टन कचरा तयार होत असताना आजही ६३० मेट्रिक टन कुठल्या आधारावर सांगते असा सवाल भट यांनी केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने दिलेल्या अहवालात पालिका वातावरणीय हवा मोजणी करत असल्याचे नमूद केले आहे. तर दुसरीकडे वायुरूप पदार्थाचे नमुने नसल्याचे सांगते. हा विरोधाभास असल्याचे भट यांनी सांगितले. पालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडवर हवेची चाचणी करणारी यंत्रणा नसल्याचे पालिकेने माहिती अधिकारात सांगितले आहे. तरी प्रदूषण मंडळ अशी यंत्रे असल्याचे धडधडीत खोटे आपल्या अहवालात म्हणते. प्रदूषण मंडळाचा हा अहवाल चुकीचा असून तो पालिकेला पाठीशी घालणारा आहे, असेही भट यांनी सांगितले.

सांडपाणी प्रकल्प फक्त कागदावरच, समुद्रकिनारेही प्रदूषित

वसईचे सागरी किनारे प्रदूषित होण्यामागे घरगुती आणि शहरांतर्गत सांडपाण्याचे मुख्य कारण आहे. या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी वसई-विरारमध्ये ठिकठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारणे अत्यंत आवश्यक आहे, मात्र उपाययोजना झालेली नाही, असा आरोप आहे.

वसई-विरार महापालिका परिसरातील असंख्य झोपडपट्ट्यांमधील, चाळींमधील सांडपाणी आणि मलजल थेट नाल्यांमध्ये सोडण्यात आले आहे. नाल्यांमधून ते थेट समुद्राला जाऊन मिळते. वसई-विरारमध्ये फक्त विरारमधील बोळिंज येथे पालिकेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे.

संपूर्ण वसई-विरारमध्ये फक्त एकच प्रक्रिया केंद्र असल्याने बाकीच्या ठिकाणाहून निघणारे सांडपाणी आणि मलजलामध्ये अपायकारक घटक कायम राहतात व ते तसेच समुद्रात सोडले जातात. या अपायकारक घटकांमुळे समुद्रात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.

याचा फटका अखेरीस अरबी समुद्रालाच बसून सागरी प्रदूषणात मोठी भर पडते. तसेच वसई-विरार परिसरातून प्रत्येक दिवशी १८४ दशलक्ष लिटर सांडपाणी समुद्रात सोडण्यात येते. ज्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही, ही माहिती ‘माहितीच्या अधिकारा’तून उघड झाली आहे.

सदर सामाजिक कार्यकर्त्याने केलेले आरोप हे अत्यंत चुकीचे असून ते बिनबुडाचे आहेत. आपण स्वत: येऊन प्रत्यक्षात पाहणी करावी. सांडपाण्याच्या प्रकल्प हा भारतातील अनेक प्रकल्पांपैकी एक असून तो अतिशय चांगला चालत असून जेवढे घाण पाणी प्रकल्पात सोडतो, ते व्यवस्थित फिल्टर होते. शहरातील साफसफाई व्यवस्थित होत असून पर्यावरण अहवाल आता बनवायला घेतला असून मागे तो बनला नव्हता.
- माधव जवादे,
शहर अभियंता, वसई-विरार शहर महानगरपालिका

वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. शहरात प्रदूषणाची समस्या वाढत आहे. वसईची हवा आणि पाणी प्रदूषित झाली असून वसईतील नागरिकांना दररोज विविध संसर्गजन्य आजारांची लागण होत आहे, ही चिंतेची बाब आहे.
- चरण भट,
सामाजिक कार्यकर्ते

Web Title: Will the 'green belt' collapse in Vasai? Solid waste, wastewater projects fail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.