मीरा-भाईंदरमध्ये क्लस्टर लागू करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2022 09:59 AM2022-12-14T09:59:13+5:302022-12-14T09:59:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मीरा-भाईंदरमधील जुन्या व धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी ठाण्याच्या धर्तीवर क्लस्टर योजना लागू करण्यात येणार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा-भाईंदरमधील जुन्या व धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी ठाण्याच्या धर्तीवर क्लस्टर योजना लागू करण्यात येणार आहे. त्याचसोबत झोपडपट्टीमुक्त शहर करण्यासाठी शहरात झोपडपट्टीवासीयांना इमारतीत पक्की घरे देण्यासाठी एसआरए योजनाही लागू करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाईंदर येथील मीरा-भाईंदर संस्कृती आर्ट फेस्टिव्हलमध्ये दिली.
प्रताप सरनाईक फाउंडेशन व संस्कृती युवा प्रतिष्ठान आदींच्या वतीने इंद्रलोक येथील बाळासाहेब ठाकरे मैदानात आयोजित आर्ट फेस्टिव्हलचा समारोप सोमवारी रात्री मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार प्रताप सरनाईक, गीता जैन, प्रकाश सुर्वे यांच्यासह जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पालिका आयुक्त दिलीप ढोले, माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा, मुझफ्फर हुसेन, नरेंद्र मेहता आदींसह अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कुमार विश्वास यांच्या कविता व मिश्कील टिप्पण्यांच्या कार्यक्रमाचा मुख्यमंत्र्यांनी आनंद घेतला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मेट्रो कारशेडच्या जागेला लोकांचा विरोध आहे. कारशेड उत्तन येथे न्यायचा आहे. मीरा-भाईंदरची मेट्रो आमदार सरनाईक यांनी आणली व त्यासाठी त्यांनी आंदोलने केले. त्यात आम्हीही सहभागी होतो. सूर्या पाणीपुरवठा योजना, शहरातील रस्ते काँक्रीटचे करण्यासाठी निधी दिला आहे. दहीसर-भाईंदर रस्ताही आम्ही करणार आहोत, ज्यामुळे टोल नाक्यातून सुटका हाेणार आहे.
आम्ही काम करायला लागल्याने काही जण आता रस्त्यावर फिरायला लागले आहेत, असा टाेला त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला.
भाषण सुरू
असताना वीज गुल
मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना काही वेळ वीज गेल्याने काळोख झाला. त्यावर भाषण बंद करू का? पोलिस आयुक्तांनी वीज घालवली का? असा मिश्कील टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.