ग्रामीण भागात मतांची टक्केवारी घटणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 06:21 AM2018-05-28T06:21:38+5:302018-05-28T06:21:38+5:30
आदिवासी गाव पाड्यातील रोजगारासाठी बरीच कुटुंबे बाहेर गावी गेल्याने तर शहरी-नीमशहरी भागातील चाकरमानी व परप्रांतीय उन्हाळ्याच्या सुटीसाठी बाहेरगावी गेल्याने ग्रामीण व आदिवासी भागात मतदानात घट होण्याची शक्यता असल्याने नेतेमंडळी चिंताग्रस्त झाली आहेत.
- शशीकांत ठाकूर
कासा : आदिवासी गाव पाड्यातील रोजगारासाठी बरीच कुटुंबे बाहेर गावी गेल्याने तर शहरी-नीमशहरी भागातील चाकरमानी व परप्रांतीय उन्हाळ्याच्या सुटीसाठी बाहेरगावी गेल्याने ग्रामीण व आदिवासी भागात मतदानात घट होण्याची शक्यता असल्याने नेतेमंडळी चिंताग्रस्त झाली आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी व कातकरी समाजातील कुटुंबे दरवर्षी पावसाळा संपल्यावर ठाणे, गुजरात, वसई, भिवंडी भागात वीटभट्टी, वाडीवर, ट्रकवर, इमारत बांधकाम आदी कामासाठी पाच ते सहा महिने बाहेर गावी जातात. ते साधारण जून महिन्याच्या सुरुवातीला पुन्हा गावाकडे येतात. यामुळे बाहेर गावी गेलेले मतदार मतदानासाठी येण्याची शक्यता कमी आहे. परप्रांतीय कामगार व स्थानिकही सहकुटुंब उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी गावाकडे जातात. ते जूनच्या पहिल्या आठवड्यात परत येतात. परिणामी त्याच फटका मतदानावर बसणार असून मतदानात त्यामुळे घट होणार आहे. त्यामुळे ही किती मंडळी मतदानासाठी येतील. त्यावर मतदानाची टक्केवारी ठरेल. त्याचप्रमाणे प्रचारासाठी कमी वेळ उमेदवाराना मिळाल्याने ग्रामीण व आदिवासी गाव पाड्यात उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी बऱ्याच ठिकाणी फिरकलेच नाही.