प्रवीण शेट्टी होणार वसई-विरारचे नवे महापौर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:00 AM2019-08-20T00:00:50+5:302019-08-20T00:01:03+5:30
संभाव्य महापौर म्हणून माजी उपमहापौर असलेले नालासोपाराचे ज्येष्ठ नेते उमेश नाईक यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते.
- आशिष राणे
वसई : वसई-विरार महापौरपदाच्या निवडणुकीसाठी सोमवार, १९ आॅगस्ट रोजी दुपारी महापौर पदासाठी वसई ‘ई’ प्रभाग समितीचे सभापती प्रवीण शेट्टी यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज पालिका नगरसचिवाकडे दाखल करण्यात आल्याची माहिती नगरसचिव संजय पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. शुक्रवार, २३ आॅगस्ट रोजी महापौरपदाची ही निवडणूक होणार आहे. विशेष म्हणजे सोमवारी या पदासाठी पालिकेतील सत्ताधारी बविआ आणि नाममात्र अशा शिवसेना-भाजप युतीकडून एकही अर्ज दाखल न झाल्याने सर्वांमध्ये आश्चर्य आहे. एकूणच बविआतून महापौर पदासाठी एकमेव प्रवीण शेट्टी यांचाच अर्ज दाखल झाल्याने आता शुक्र वारी संपन्न होणाऱ्या निवडणुकीत केवळ त्यांच्या घोषणेची औपचारिता बाकी आहे. या निवडणुकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून पालघर जिल्हाधिकारी कैलास शिंदे हे काम पाहतील. दरम्यान, वसई - विरारचे मावळते महापौर रुपेश जाधव यांनी गेल्या महिन्यात महापौर पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठी आणि पालिका आयुक्तांकडे दिला होता.
उमेश नाईक नाउमेद?
संभाव्य महापौर म्हणून माजी उपमहापौर असलेले नालासोपाराचे ज्येष्ठ नेते उमेश नाईक यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते. मात्र, ऐनवेळी धक्कातंत्र देत पुन्हा एकदा आ. हितेंद्र ठाकूर यांनी वेगळेच नाव समोर आणून या पदासाठीच्या शर्यतीत शक्तीप्रदर्शन करणाऱ्यांना सणसणीत चपराक दिली आहे.