जिंकणार की जिंकून देणार?

By admin | Published: February 15, 2016 02:55 AM2016-02-15T02:55:59+5:302016-02-15T02:55:59+5:30

पारंपारिक दुरंगी लढतीत एकाला विजयी करणाऱ्या या मतदारासंघात अनेक वर्षानंतर बविआच्या रुपाने तिरंगी लढत झाली.

Will win that win? | जिंकणार की जिंकून देणार?

जिंकणार की जिंकून देणार?

Next

पालघर : पारंपारिक दुरंगी लढतीत एकाला विजयी करणाऱ्या या मतदारासंघात अनेक वर्षानंतर बविआच्या रुपाने तिरंगी लढत झाली. त्यामुळे बविआ जिंकणार की तिची उमेदवारी युती अथवा आघाडीच्या विजयाला हातभार लावणार या प्रश्नाची चर्चा सध्या पालघरमध्ये होते आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकांची मतदानाची आकडेवारी असे सांगते की, गत विजेत्याचा विजय हा अगदी थोड्या मताधिक्क्याने झाला आहे. व तोही एकास एक लढत असल्याने परंतु या वेळी तिघाही मातब्बर उमेदवारांची तिरंगी लढत झाल्याने नवख्या असलेल्या बविआची उमेदवारी विजयी होते की घोडा किंवा गावितांच्या विजयाला हातभार लावते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
तिसऱ्या उमेदवारीमुळे या निवडणुकीतील सर्व पारंपारिक समीकरणं बदलून गेलीत हे सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते मान्य करतात. त्यातच मतदानाची टक्केवारी गतवेळेच्या तुलनेत घटली आहे. त्यामुळे तिसरी उमेदवारी आणि घटलेले मतदान याचा फायदा ज्या उमेदवाराला होईल त्याच्या गळ्यात विजश्री माळ घालेल, अशी चिन्हे आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या कृष्णा घोडा यांना ४६१४२ मते मिळाली होती. तर काँग्रेसचे राजेंद्र गावीत यांना ४५६२७ मते मिळाली होती. म्हणजे घोडा यांनी अवघ्या ५१५ मतांच्या अधिक्याने विजय मिळविला होता. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे गावीत यांना ५५६६५ मते मिळाली होती. तर शिवसेनेच्या मनिषा निमकर यांना ३४६९४ मते प्राप्त झाली होती. त्यामुळे गावितांचे मताधिक्य २०९७१ इतके होते.
तर २००४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या मनिषा निमकर यांना ५८६२७ मते मिळाली होती. तर काँग्रेसच्या गावीत यांना ५०१८६ मते मिळाली होती. निमकर यांनी गावितांचा ८४४१ मतांनी पराभव केला होता. तर १९९९ मध्ये निमकर यांनी ४६०१५ मते मिळवून जनता दल सेक्युलरच्या गीता पागी यांचा २४३४२ मताधिक्याने पराभव केला होता. या निवडणुकीत काँग्रेसला येथे तुल्यबळ उमेदवारही लाभला नव्हता. १९९५ मध्ये सेनेच्या निमकर यांनी ५५३९९ मते मिळवून काँग्रेसच्या जगन्नाथ रहाणे यांना पराभूत केले होते.
यावेळी निमकरांचे मताधिक्य २०१४९ होते. यावेळीही काँग्रेसला तगडा उमेदवार न मिळाल्यामुळे निमकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली होती. १९९० मध्ये सेनेच्या अविनाश सुतार यांनी ३६१४१ मते मिळवून जनता दलाच्या काळूराम धोदडे यांचा पराभव केला होता. त्यांना २८४२४ मते मिळाली होती. त्यांचे मताधिक्य ७७१७ होते.
तर १९८५ मध्ये काँग्रेसच्या विष्णू वळवी यांनी जनता पक्षाच्या अर्जुन शिंगाडे यांचा पराभव केला होता. वळवी यांना २२४९५ तर काकडे यांना १६७२९ मते मिळाली होती. वळवी यांचे मताधिक्य ५५६६ इतके होते. १९७८ मध्ये जनता पक्षाच्या अर्जुन शिंगाडे यांनी ३२६३५ मते मिळवून काँग्रेसच्या जनार्दन शेलार यांचा पराभव केला होता. त्यांना १६९३४ मते मिळाली होती. शिंगाडे यांचे मताधिक्य १५७०१ इतके होते. १९७२ मध्ये पालघर हा मतदारसंघ खुला होता. त्यातून काँग्रेसच्या विनायक पाटील यांनी ३२४४१ मते मिळवून समाजवादी पक्षाच्या मोरेश्वर मिस्त्री यांचा पराभव केला होता. त्यांना १७२८५ मते मिळाली होती. पाटील यांचे मताधिक्य १५१५६ इतके होते. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Will win that win?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.