सख्ख्या भावाच्या खून प्रकरणातील साक्षीदाराला मिळेना पोलीस संरक्षण, शासकीय यंत्रणांचे असहकार्य?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 08:33 AM2021-03-15T08:33:30+5:302021-03-15T08:34:16+5:30
१९८८ साली कामण येथील यादव म्हात्रे यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. त्या वेळी या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार त्यांचे सख्खे भाऊ गंगाधर म्हात्रे हे होते.
आशीष राणे -
वसई : ३२ वर्षांपूर्वी सख्ख्या भावाच्या खुनाच्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या ज्येष्ठ आदिवासी समाजसेवकाची पोलीस संरक्षणासाठी वणवण सुरू आहे, मात्र शासकीय पातळीवर त्यांची ससेहोलपट होत असल्याची गंभीर बाब ऐरणीवर आली आहे. (Witness in of brother's murder case without police protection)
१९८८ साली कामण येथील यादव म्हात्रे यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. त्या वेळी या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार त्यांचे सख्खे भाऊ गंगाधर म्हात्रे हे होते. त्यांच्या साक्षीवरून आरोपींचा शोध लागून हा खटला अंतिम टप्प्यात आला आहे. त्यासाठी म्हात्रे यांना ३२ वर्षे एकाकी लढा द्यावा लागला आहे.
गंगाधर म्हात्रे यांच्यावरही प्राणघातक हल्लाही झाला होता. त्यानंतर म्हात्रे यांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता मे २०१७ ला पालघर ग्रामीण पोलीस दलाकडून अचानकपणे पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले. त्यामुळे गंगाधर म्हात्रे यांनी त्या वेळी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितल्यावर, न्यायालयाच्या आदेशानुसार एप्रिल २०१८ ला त्यांना पुन्हा संरक्षण देण्यात आले. परंतु तेही डिसेंबर २०१९ ला काढून घेण्यात आले. त्यामुळे म्हात्रे यांनी पुन्हा एकदा दि. १९ डिसेंबर २०२० ला मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि सीआयडीकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली. दरम्यान, दि. २० जानेवारी २०२१ रोजी सीआयडी कोकण भवनच्या उपअधीक्षक केतकी खोत यांनीही पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून कार्यवाहीची सूचना केली आहे, मात्र तीन महिने होत आले तरी त्यांना अद्याप पोलीस संरक्षण देण्याच्या कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत.
मयत यादव म्हात्रे खुनाचा खटला अंतिम टप्प्यात आला आहे. या प्रकरणात माझ्यावर प्राणघातक हल्लाही झाला होता, तर मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्यामुळे मला पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न कधीही करण्यात येईल. त्यासाठी मला अपघातात किंवा गुंडांकरवी ठार मारण्याचीही शक्यता अधिक आहे.
- गंगाधर म्हात्रे,
आदिवासी सेवक
आदिवासी समाजसेवक गंगाधर म्हात्रे यांच्या पोलीस संरक्षण मागणीबाबतीत वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार विरार व वालीव पोलीस स्टेशनमधून प्रत्यक्ष व वास्तव स्थिती काय आहे याचा अहवाल मागविण्यात आला असून, लवकरच तो पोलीस आयुक्तांना पाठविण्यात येईल.
- प्रशांत वाघुंडे, वसई विरार
पोलीस आयुक्तालय
परिमंडळ-२ वसई पूर्व