महिला सफाई कामगाराची इमानदारी; गहाळ झालेली सोन्याची चैन परत केली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 07:47 PM2019-01-17T19:47:27+5:302019-01-17T19:51:27+5:30
आरएनपी पार्क परिसरात सफाईचे काम करणाऱ्या एका कंत्राटी महिला सफाई कामगाराने सापडलेली दोन तोळे सोन्याची चैन मूळ मालकाला इनामदारीने परत केल्याची घटना बुधवारी समोर आली.
भाईंदर - आरएनपी पार्क परिसरात सफाईचे काम करणाऱ्या एका कंत्राटी महिला सफाई कामगाराने सापडलेली दोन तोळे सोन्याची चैन मूळ मालकाला इनामदारीने परत केल्याची घटना बुधवारी समोर आली. या महिलेच्या इमानदारीची चर्चा परिसरात सुरू आहे. भाईंदर पूर्वेकडील आरएनपी पार्क परिसरातीलच कोळीवाड्यात राहणारे रोहित डेनिस माल्या यांची चार दिवसांपूर्वी दोन तोळे सोन्याची चैन गहाळ झाली होती. ही बाब लक्षात येताच त्यांच्यासह त्यांचे नातेवाईक आणि मित्रांनी परिसरात चैन शोध मोहीम सुरू केली.
दरम्यान याच परिसरात साफसफाईचे काम करणाऱ्या पालिकेच्या महिला कंत्राटी कामगार पूर्वावती राजकुमार मेश्राम (४५) दोन दिवसांपूर्वी दुपारच्या सुमारास साफसफाईचे काम करत होत्या. त्यावेळी तेथील एका खड्ड्यात साठलेले पाणी त्या बाहेर उपसत होत्या. त्याच वेळी त्यांना खड्ड्यात एक चैन सापडली. त्यांनी ती सोन्याची असल्याची खात्री करुन घेत याची माहिती संघटनेच्या कार्यालयातील पदाधिकाऱ्यांना दिली.
ज्याची ती चैन आहे, त्यांना ती परत करण्याचा निर्धार करुन त्यांनी ती स्वत:जवळच ठेवली. काही व्यक्ती परिसरात सोन्याची चैन शोधत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी त्याची खात्री करुन घेत ती चैन रोहित यांना परत केली. आपली हरवलेली सोन्याची चैन पुन्हा मिळाल्याचा आनंद व्यक्त करीत रोहित यांनी पूर्वावती यांचे आभार मानले.