महिलादिनीच नवविवाहितेची हत्या
By admin | Published: March 10, 2017 02:52 AM2017-03-10T02:52:44+5:302017-03-10T02:52:44+5:30
जागतिक महिला दिनी विरारमधील एका नवविवाहीतेची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. सासरच्यांनी नवविवाहितेचा गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन मृत्यु
वसई : जागतिक महिला दिनी विरारमधील एका नवविवाहीतेची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. सासरच्यांनी नवविवाहितेचा गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन मृत्यु झाल्याचा बनाव रचला होता. मात्र, पोलिसांनी तिची हत्या केल्याच्या आरोपाखाली पतीला अटक केली आहे.
अपर्णा उर्फ संपदा सांबरे (२५) असे तिचे नाव आहे. अपर्णाचे ११ फेब्रुवारीला सागर सांबरे (२८) याच्याशी लग्न झाले होते. दोघे विरार पश्चिमेकडील शुभ लाभ इमारतीत रहात होते. एकीकडे जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांचा गौरव केला जात असताना अपर्णासाठी मात्र तो दिवस अखेरचा ठरला. काही दिवसांपूर्वीच लग्न झालेली अपर्णा सुखी संसाराची स्वप्ने रंगवत होती. मात्र, संध्याकाळी घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन अपर्णाचा मृत्यु झाला होता.
अपर्णाचे सुनील मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी गॅसचा पाईप निघालेला होता. तर अपर्णाचा मोबाईल तिच्या जळालेल्या मृतदेहाशेजारी पडलेला होता. प्रारंभी अपर्णाने आत्महत्या केल्याचे मोरे यांना सांगण्यात आले होते. पण, आपल्या मुलीची हत्या करण्यात आल्याचा आरोप करीत मोरे यांनी तशी तक्रार विरार पोलीस ठाण्यात दिली.
अपर्णा सोशल मिडीयावर सतत आपल्या मित्रांशी बोलत असे. त्यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असत. याप्रकारामुळे सागर तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. गॅस सिलेंडरचा स्फोट झाला त्यादिवशी सागर अर्धा दिवसानंतर सुट्टी घेऊन घरी आला होता. त्यामुळे अपर्णाच्या घरच्यांनी सागरवर संशय घेतला आहे. प्रत्यक्षात गॅस सिलेंडरचा स्फोट झालाच नव्हता. पण, तिने जाळून घेऊन आत्महत्या केल्याचे तिच्या सासरच्यांनी सांगितले. मात्र, अपर्णाला जाळून ठार मारण्यात आल्याची तिच्या वडिलांची तक्रार आहे. त्यावरून विरार पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करून सागरला अटक केली आहे. (प्रतिनिधी)