व्होटर स्लीपवर पुरुषांच्या जागी महिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:17 IST2019-04-27T23:17:11+5:302019-04-27T23:17:46+5:30
पुरुषांचे नाव असलेल्या स्लीपवर महिलेचा तर महिलेचे नांव असलेल्या स्लीपवर पुरुषाचा फोटो असा निवडणुक आयोगाचा अजब कारभार समोर आला आहे.

व्होटर स्लीपवर पुरुषांच्या जागी महिला
राहुल वाडेकर
विक्रमगड : राज्य निवडणुक आयोगाच्या सार्वत्रिक निवडणुकीत पालघर लोकसभेकरीता निवडणूक आयोगाकडून देण्यांत येणाऱ्या मतदान चिठ्ठयांवर (व्होटर स्लीप) पुरुषांचे नाव असलेल्या स्लीपवर महिलेचा तर महिलेचे नांव असलेल्या स्लीपवर पुरुषाचा फोंटो असा निवडणुक आयोगाचा अजब कारभार समोर आला आहे. तर या स्लीप वाटप करणाऱ्या बिएलओंना या चुकांमुळे त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील जुनी बाजारपेठे येथील रहिवासी भास्कर बाळकृष्ण मुळे व अतुल विलास वाडेकर यांचे व्होटर स्लीपर महिलेंचा फोटो छापण्यात आला आहे़ तर शालीनी बाळकृष्ण मुळे यांच्या व्होटर स्लीपवर पुरुषाचा फोटो छापला आहे़ विक्रमगडमध्ये बुधवारपासून बिएलओ यानी व्होटर स्लीप वाटण्यासाठी सुरुवात केली़ परंतु बुधवारी स्लीप वाटपा दरम्यान त्यांना लक्षात आले की, काही स्लीपवर इमारतींची नावेच छापलेली नाहीत. अनेक स्लीपवर तर सदनिका क्रमांक नाही, काही त्या ठिकाणी राहातच नाहीत अशा अनेक समस्या आहेत़ आणखीही काही समस्या समोर येवु शकतात. त्यामुळे बिएलओ कर्मचाऱ्यांना व्होटर स्लिप वाटतांना मोठा त्रास होत आहे.
हे कर्मचारी भर उन्हामध्ये या मतदान चिठ्ठ्यांचे वाटप करत आहेत़ मात्र, विहित पत्त्यावर गेल्यावर समजते की, स्लीपवरील व्यक्ती तेथे राहात नाहीत किंवा त्यांच्या नावामध्ये काही तरी चुकीचे छापले आहे़ या समस्या समोर येत असल्याने त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे़ मतदारही गोंधळलेले आहेत.
आयोगाच्या उद्देशाला तांत्रिक चुकांमुळे हरताळ
निवडणुक आयोगाकडुन या वर्षी मतदान चिठ्ठीमध्ये थोडाफार नवीन बदल केले आहेत. जेणे करुन लोकाना सर्व माहिती छापलेली चिठ्ठी मिळावी. या उद्देशाने यावेळी आयोगाने मतदाराचे नांव छायाचित्र मतदान केंंद्र कमांक, मतदान यादी भाग क्रमांक मतदानाची वेळ अशी पूर्ण माहिती असलेली चिठ्ठी छापून देण्यास सुरुवात केली आहे़े. स्लीप वाटपा दरम्यान त्यांना लक्षात आले की, काही स्लीपवर इमारतींची नावेच छापलेली नाहीत. अनेक स्लीपवर तर सदनिका क्रमांक नाही, काही त्या ठिकाणी राहातच नाही.