वसईहून सुटणार महिला स्पेशल, रेल्वे प्रशासनाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 02:32 AM2018-12-22T02:32:46+5:302018-12-22T02:34:33+5:30
सकाळी गर्दीच्या वेळी सध्या विरारहून सुटणारी महिला विशेष लोकल पुन्हा एकदा वसई रोड स्थानकावरून सोडण्याचा निर्णय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी जाहीर केला आहे.
वसई - सकाळी गर्दीच्या वेळी सध्या विरारहून सुटणारी महिला विशेष लोकल पुन्हा एकदा वसई रोड स्थानकावरून सोडण्याचा निर्णय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी जाहीर केला आहे. २५ डिसेंबरपासून हा निर्णय अंमलात येणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
वसई रोड येथून सकाळी वाजून ९.५७ मिनिटांनी महिलांसाठी विशेष लोकल सोडण्यात येत होती. नोकरी करणाऱ्या महिलांसह, वयोवृद्ध, आजारी आणि गर्भवती महिलांसाठी ऐन गर्दीच्या वेळेत या लोकलमुळे मोठा दिलासा मिळत होता. नायगांव, भार्इंदर स्थानकातील महिलांनाही ही लोकल सोयीची ठरत होती. परंतु
१ आॅक्टोबरपासून पश्चिम रेल्वेने बदललेल्या लोकलच्या वेळापत्रकात वसई रोडवरून सुटणारी विशेष महिला लोकल रद्द करून ती विरारहून सोडण्याचा निर्णय घेतला होता . वसई रोड येथून प्रवास करणाºया महिला प्रवाशांची संख्या तुलनेने कमी असल्याचे कारण रेल्वेकडून देण्यात आले. याबाबत रेल्वेकडून पाहणी करण्यात आली होती. त्याशिवाय भार्इंदरवरून सुटणारी महिला लोकलही अशाच पद्धतीने विरारहून सोडण्यात येत आहे. रेल्वेच्या या निर्णयाविरोधात वसई रोड- नायगांव, मीरा-भार्इंदरहून प्रवास करणार्या महिलांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता.
वसई, नायगांव, भार्इंदर आणि मीरा रोड येथून प्रवास करणाºया महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. रेल्वेने काढलेला निष्कर्ष चुकीचा असून महिला विशेष लोकल पुन्हा वसई वरून सोडण्यात यावी, अशी मागणी महिला प्रवाशांनी केली. लोकल विरार व नालासोपारा येथूनच भरून येऊ लागल्याने वसई तसेच नायगांव येथील महिलांना लोकलमध्ये चढणे त्रासदायक होऊ लागले.
याबाबत मध्यंतरी वसईतील महिलांच्या शिष्टमंडळाने आमदार हितेंद्र ठाकूर व आमदार क्षितिज ठाकूर यांची भेट घेतली होती. आ. क्षितिज ठाकूर यांनी त्यानंतर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांसोबत चर्चाही केली होती. याबाबत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या समस्येवर तोडगा काढला असून महिला लोकलची संख्या दोनने वाढवण्यात आली आहे. त्यानुसार २५ डिसेंबरपासून वसईहून पूर्वीप्रमाणेच सकाळी महिला विशेष लोकल सुटणार आहे.
विविध संघटना व पक्षांच्या मोर्चेबांधणीला यश
महिलांच्या शिष्टमंडळाने पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक संजय मिश्रा यांची भेट घेत महिला लोकल ट्रेन रद्द करू नये म्हणून सर्वप्रथम निवेदन सादर केले होते. ही लोकल रद्द करू नये म्हणून सह्यांची मोहिमही हाती घेण्यात आली होती. रेल्वे प्रवासी अँड. मृदुला खेडेकर यांच्या शिष्टमंडळाने आमदार हितेंद्र ठाकूर व आमदार क्षितिज ठाकूर यांची विरार येथे भेट घेत याबाबत रेल्वेच्या वरिष्ठांशी चर्चा करावी म्हणून विनंती केली होती.
त्यानंतर आमदार क्षितिज ठाकूर यांनी त्वरित हालचाल करून अप्पर महासंचालक राहुल जैन यांना पत्र पाठवून निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली होती. तसेच, शिवसेनेकडूनही विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले होते. ‘मी वसई कर’ अभियानानेही सह्यांची मोहीम हाती घेत ही लोकल पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले होते.
रेल्वेने महिला स्पेशल लोकलसाठी केलेला सर्वे चुकीचा केला होता. वसई रोड व पुढील स्थानकावरून प्रवास करणाºया महिलांना ही वसई लोकल रद्द केली तर मोठा त्रासाला सामोरे जावे लागले होते.
- अँड. मृदुला खेडेकर, महिला स्पेशल
लोकल प्रवासी