साखरा पुलाचे काम अद्याप अपूर्ण; प्रवाशांच्या जीवाशी खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 11:08 PM2019-08-05T23:08:49+5:302019-08-05T23:08:54+5:30
रखडलेल्या पुलाच्या कामामुळे नागरिक त्रस्त
- हुसेन मेमन
जव्हार : संततधार पावसामुळे जव्हार - विक्र मगड - पालघर मार्गावरील साखरा पूल रोजच पाण्याखाली जात असल्याने जव्हार मोखाडा आणि खोडाळा तालुक्यातील नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी अथवा ठाणे, मुंबईला जाण्यासाठी बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते. तीन वर्षांपासून या पुलाच्या अपूर्ण आणि रखडलेल्या कामांमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरु आहे.
आजतागायत या पुलाचे काम अपूर्ण आहे. ठेकेदाराच्या कामांच्या दिरंगाईमुळे पावसाळ्यात वाहन चालकांवर निष्कारण त्रास सहन करण्याची वेळ येते आहे. पूल पाण्याखाली जात असल्याने वाहन चालकांना पुलाच्या काठावर बसून पुलावरील पाणी कमी होण्याची तासन्तास वाट पहावी लागत आहे.
या नदीवरील पुलाचे काम आर.के.सावंत, नाशिक यांना देण्यात आले. मात्र, तीन वर्षे उलटली तरी हे काम पूर्ण झालेले नाही. सध्या तरी जुनाट आणि धोकादायक पूलावरून वाहतूक सुरु आहे. या जुन्या पुलाची उंची कमी असल्याने तासभर पाऊस राहिला की, हा जुनाट पूल लगेच पाण्याखाली जातो.
या साखरा पुलाचे काम लवकरच व्हावे म्हणून येथील ग्रामस्थांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्र ारी केल्या आहेत. मात्र हा जव्हार - विक्र मगड आणि पालघर रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित झाल्याचे सार्वजनिक बांधकाम सांगत आहे. परंतु राष्ट्रीय महामार्ग हा रस्ता आमच्याकडे हस्तांतरित झाला नसल्याचे सांगत रखडलेल्या साखरा पुलाची जबाबदारी घ्यायला तयार नाही. मग, या साखरा पुलाचे काम पूर्ण होईल तरी कसे असा सवाल नागरिकांना पडला आहे.
पूल पाण्याखाली विद्यार्थ्यांना फटका
साखरा गावातील साखरा आश्रम शाळा आणि ऐना आश्रम शाळा या दोन्ही आश्रम शाळा या साखरा पुलाच्या जव्हारच्या बाजूने असल्याने साखरा गावातील आणि त्या परिसरातील विद्यार्थ्यांनाही शाळेला दांडी मारावी लागते आहे.
आश्रम शाळेचे काही कर्मचारी साखरा गावात राहत असल्याने त्यांचाही खोळंबा होतो. दोन्ही आश्रम शाळेतील आजारी विद्यार्थ्यांना त्या बाजूने साखरा येथे घेऊन जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे.
साखरे पुलावरील खड्डे बुजवले
विक्रमगड : सातत्याने पडणाºया पावसात विक्रमगड - जव्हार मार्गावरील साखरे गावाजवळील जुन्या पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता वाहनांसाठी सुरक्षित करण्यासाठी या गावातील तरूणांनी श्रमदानातून सोमवारी हे खड्डे दगड, माती टाकून बुजवले आणि रस्ता वाहनांसाठी सुरू केला. मात्र, पुन्हा पावसाचा जोर वाढला व पुलावरून पाणी गेले तर पुन्हा खड्डे पडतील.
चारोटीमार्गे पालघर गाठावे लागते
साखरा येथील जुनाट पूल पाण्याखाली तर नवीन पुलाचे काम चार वर्षांपासून संथगतीने सुरू असून अपूर्ण आहे. त्यामुळे जुनाट पूल सतत पाण्याखाली असल्याने या जव्हार, मोखाडा आणि खोडाळा या तालुक्यातील वाहन चालकांना जव्हार चारोटी मार्गे लांबचा पल्ला मारून मुंबई - अहमदाबाद
हायवे मार्गे पालघर, ठाणे, मुंबई गाठावे लागते. या लांबच्या फेºयामुळे चालक नाराज आहेत.
जव्हार - विक्र मगड - पालघर हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित झालेला नाही. अजूनही तो बांधकाम विभागाकडेच आहे. त्यामुळे त्या रखडलेल्या पुलाच्या कामाचे सांगता येणार नाही.
- निलेश महाजन, उपअभियंता राष्ट्रीय महामार्ग.
साखरा पुलाचे रखडलेले काम लवकरच व्हावे यासाठी आम्ही अनेकदा ग्रामसभेत ठराव घेऊन तक्र ार केली आहे. तरीही या रखडलेल्या पुलाचे काम अपूर्ण आहे. यामुळे परिसरातील नागरिक, शाळकरी विद्यार्थी आणि चालकांना त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.
- कांता भुसारा, साखरा ग्रा.सदस्य.