कोंढले उपकेंद्राचे काम ६ वर्षे अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 01:41 AM2017-08-03T01:41:58+5:302017-08-03T01:41:58+5:30
तालुक्यातील वाढती लोकसंख्या व औद्योगिककरण याचा विचार करून महावितरणने कोंढले येथील ४०० केव्हीए च्या वीज उपकेंद्राला सन २०११ मध्ये मंजुरी देऊन कामाला सुरु वात केली होती.
वाडा : तालुक्यातील वाढती लोकसंख्या व औद्योगिककरण याचा विचार करून महावितरणने कोंढले येथील ४०० केव्हीए च्या वीज उपकेंद्राला सन २०११ मध्ये मंजुरी देऊन कामाला सुरु वात केली होती. मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मुदत संपून सहा वर्षे झाली तरी काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे नागरिक व उद्योजकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
वाडा तालुक्यात डी प्लस झोनमुळे उद्योगधंदे वाढले. गांध्रे (वाडा) येथे असलेल्या वीज वितरण केंद्रावर मोठा भार पडत होता. तसेच वीज जनित्रांमध्ये बिघाड होऊन अनेक गावे अंधारात बुडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यावर उपाय म्हणून वीज वितरण कंपनीने येथे ४०० केव्हीए उपकेंद्राला मंजुरी दिली. २०११ मध्ये १९.७५ हेक्टर जागेवर २२ महिन्याच्या मुदतीत हे काम पूर्ण करण्याच्या अटीवर या कामाचा ठेका ज्योती स्ट्रक्चरला दिला. मुदत संपून सहा वर्षे उलटली तरीही हे काम अपूर्णच आहे.
या उपकेंद्रातून वीज मिळेल, आपली कंपनी सुरू होईल या आशेवर तीनशेपेक्षा जास्त उद्योजक आजही आहेत. मात्र हे उपकेंद्र रखडल्याने वीज उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या कंपन्या बंद आहेत. शिवाय या परिसरातील वीजेच्या लपंडावाने येथील नागरिकही त्रस्त झाले आहेत.
या उपकेंद्राचे घोंगडे भिजत राहिल्याने उद्योजकांसह नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. वीज उपकेंद्राचे काम युध्दपातळीवर करून पूर्ण करण्याची मागणी भाजपाच्या कार्यकत्या अंकिता दुबेले यांनी महावितरणकडे केली आहे. यासंदर्भात महावितरणचे अधिकारी चंद्रशेखर कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता वीज उपकेंद्राच्या कामाची मुदत सन २०१८ पर्यंत असून येत्या नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात हे काम पूर्ण होईल अशी माहिती त्यांनी दिली.
मात्र ही मुदतवाढ कोणी, कधी, केंव्हा, कशासाठी दिली याचा कोणताही खुलासा त्यांनी अथवा महावितरणने केलेला नाही.