‘भाभा’ तील कामगाराचा हात निकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2022 08:38 AM2022-03-08T08:38:57+5:302022-03-08T08:39:01+5:30
बीएआरसीच्या प्लांटमध्ये अणू इंधनाची पुनर्प्रक्रिया करणाऱ्या इंटिग्रेटेड न्यूक्लिअर रिसायकल प्लांट (आयएनआरपी) च्या उभारणीचे काम सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
बोईसर : तारापूर येथील भाभा अणू संशोधन केंद्रामध्ये (बीएआरसी) शनिवारी झालेल्या अपघातात एका कंत्राटी कामगाराचा उजवा हात मशीनमध्ये अडकून निकामी झाला आहे. त्याच्यावर बोईसर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गंभीर घटनेसंदर्भात तारापूर पोलीस ठाण्यात सोमवारी संध्याकाळपर्यंत कळविले नव्हते.
बीएआरसीच्या प्लांटमध्ये अणू इंधनाची पुनर्प्रक्रिया करणाऱ्या इंटिग्रेटेड न्यूक्लिअर रिसायकल प्लांट (आयएनआरपी) च्या उभारणीचे काम सुरू असून डहाणू येथील राजू खिरारी (३६) हा कंत्राटी कामगार टाटा प्रोजेक्ट कंपनीच्या अंतर्गत असलेल्या अन्य कंत्राटदाराद्वारे काँक्रिटीकरणाचे काम करीत होता. ५ मार्च रोजी सकाळी ११ च्या दरम्यान सिमेंटच्या गोणीमध्ये हात अडकून यंत्रात खेचला गेल्याने उजव्या हाताच्या कोपऱ्यापासून ५ ते ६ इंचांपुढे पंज्यापर्यंतचा भाग चिरडला गेल्याचे समजते. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तळहात वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र गंभीर दुखापतीमुळे तळहातापासूनचा पुढील काही भागापर्यंतचा हात कापावा लागला. या घटनेचा तारापूर पोलिसांकडून तपास होईल तेव्हा निश्चित माहिती समोर येईल. यापूर्वीही अपघात झाल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.
बीएआरसीमध्ये शनिवारी झालेल्या अपघाताची माहिती तारापूर पोलीस ठाण्यात सोमवारी संध्याकाळपर्यंत कळविलेली नव्हती.
- योगेश जाधव, साहाय्यक पोलीस निरीक्षक, तारापूर पोलीस ठाणे