वनक्षेत्रपालाविरोधात श्रमजीवीचा मोर्चा
By admin | Published: March 9, 2017 02:12 AM2017-03-09T02:12:56+5:302017-03-09T02:12:56+5:30
वनजमिनीवर होणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय देऊन संघटनेच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केलेल्या वनक्षेत्रपालाविरोधात श्रमजीवी
वसई : वनजमिनीवर होणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय देऊन संघटनेच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केलेल्या वनक्षेत्रपालाविरोधात श्रमजीवी संघटनेने गोखीवरे रेंज आॅफिसवर मंगळवारी मोर्चा नेला होता. यावेळी खोटे गुन्हे मागे घेतले जातील आणि वनखात्याच्या जागेवर झालेले अतिक्रमण दूर केले जाईल, अशी ग्वाही दिल्यानंतर मोर्चा संपवण्यात आला.
वसई तालुक्यात वन विभागाच्या आणि आदिवासींच्या जागा हडप करून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. याप्रकरणी वनक्षेत्रपाल दिलीप तोंडे कोणतीच कारवाई करीत नाहीत. उलट याप्रकरणी तक्रार करणाऱ्या श्रमजीवी संघटनेच्या आत्माराम ठाकरे यांच्यासह काही कार्यकर्त्यां विरोधात तोंडे यांनी खोट्या तक्रारी केल्याचा आरोप करीत श्रमजीवी संघटनेच्या वतीने मंगळवारी वसईतील गोखीवरे येथील रेंज आॅफिसवर मोर्चा नेण्यात आला होता. संघटनेचे उपाध्यक्ष रामभाऊ वारणा, सुरेश रेंजड, आत्माराम ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात आदिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तोंडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. शेवटी वनखात्याचे वरिष्ठ अधिकारी आणि वालीव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांशी बोलणी करून तोडगा काढला. श्रमजीवीचे ठाकरे आणि कार्यकर्त्यांविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील. वनखात्याच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाविरोधात कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिल्यानंतर मोर्चा समाप्त करण्यात आला. (प्रतिनिधी)