उल्हासनगरच्या कामगार रूग्णालयाची पुनर्बांधणी रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 11:27 PM2020-02-12T23:27:35+5:302020-02-12T23:27:43+5:30
वर्षभरापूर्वी झाले होते भूमिपूजन
सदानंद नाईक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : येथील कामगार रूग्णालयाच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन वर्षापूर्वी मोठा गाजावाजा करत झाले. पण अद्याप कामाला सुरूवातही झालेली नसून हे रूग्णालय सध्या धोकादायक इमारतीमध्येच सुरू आहे. येत्या पावसाळ््यापूर्वी पवई चौकातील एका खाजगी जागेत रूग्णालय स्थलांतरीत केले जाणार आहे. शस्त्रक्रिया सोडून सर्व उपचार केले जाणार असल्याची माहिती रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. विलास डोंगरे यांनी दिली. तीन वर्षात १२० च्या निधीतून १०० बेडचे आधुनिक रुग्णालय बांधले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उल्हासनगर कॅम्प नं-३ येथे कामगार रूग्णालय असून हजारो कामगार येथे तसेच कुटुंबातील सदस्यांसाठी उचारासाठी येत असतात. त्यांच्यावर विनामूल्य उपचार केले जातात. ठाणे जिल्ह्यात फक्त दोनच कामगार रूग्णालय असून दोन्ही रूग्णालयांना अवकळा आली आहे. रूग्णालयाची इमारत धोकादायक झाल्याने ५ वर्षापूर्वी शस्त्रक्रीया विभाग बंद करण्यात आला. खाजगी रूग्णालयात शस्त्रक्रियेसह प्रसूती तेथे केली जाते. रूग्णालयाच्या पुनर्बांधणीचा प्रश्न खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाच वर्षापूर्वी लावून धरल्यावर दोन वर्षापूर्वीच पुनर्बांधणीला मंजुरी मिळाली. लोकसभा निवडणुकीपूर्वी १२० कोटींच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या रूग्णालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम खासदार शिंदे यांच्या हस्ते झाला होता.
इमारतीच्या पुनर्बांधणीपूर्वी रूग्णालय खाजगी जागेत हलविणे गरजेचे आहे. कॅम्प नं-३ पवई चौकातील एका खाजगी जागेत कामगार रूग्णालय स्थलांतरीत करण्यात येणार असून तेथे बाह्यरूग्ण विभाग सुरू राहणार आहे. रूग्णावर उपचार, शस्त्रक्रिया व इतर कामे खाजगी रूग्णालयाकडून करण्यात येणार असून त्यांचा सर्व खर्च राष्ट्रीय कामगार विमा सोसायटीच्या वतीने केला जाणार असल्याचे डॉ. डोंगरे यांनी सांगितले. पावसाळयापूर्वी रूग्णालय खाजगी जागेत स्थलांतरीत केले नाहीतर, रूग्णालय बंद करण्याचे संकेतही त्यांनी दिले. धोकादायक झालेल्या रूग्णालयाच्या इमारतीत डॉक्टरांसह १५० जणांचा कामगार वर्ग तसेच रूग्ण व त्यांच्या सोबत असलेले नातेवाईक जीव मुठीत घेऊन राहतात. सरकारकडे पाठपुरावा होत नसल्याने भूमिपूजनाला एक वर्ष उलटून कामाला सुरूवात झाली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
३२ रूग्णांसाठी १५० डॉक्टर
१०० खाटाच्या कामगार रूग्णालयात फक्त ३२ रूग्ण उपचार घेत असून बाह्यरूग्ण विभागात १०० पेक्षा जास्त रूग्णांची नोंद आहे. धोकादायक इमारत झाल्याने, रूग्ण येथे उपचार करण्यासाठी येत नसून रूग्णांपेक्षा डॉक्टर व कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे.