कामगारांना आता पालघरमध्ये मोफत विमा, औषधोपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 12:41 AM2020-12-02T00:41:50+5:302020-12-02T00:42:19+5:30
राज्य विमा निगमचे कार्यालय सुरू : वेबसाइटवर करता येणार नोंद
पालघर : मुंबईच्या जवळ असणाऱ्या पालघर जिल्ह्यात कर्मचारी राज्य विमा निगमचे कार्यालय नसल्याचे कळल्यावर वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करून पालघरमध्ये हे कार्यालय सुरू करण्यात यश आल्याचा आनंद आहे. या कार्यालयामुळे गरीब कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांना विमा कवच, नानाविध औषधोपचार, महिलांना मातृत्वासोबतच अनेक योजनांचा लाभ मिळणार असल्याचे कर्मचारी राज्य विमा निगमचे अप्पर आयुक्त प्रणय सिन्हा यांनी सांगितले.
श्रम आणि रोजगार मंत्रालय भारत सरकारच्या कर्मचारी राज्य विमा निगमअंतर्गत औषधालयासह शाखा या विभागाच्या कार्यालयाचे उद्घाटन सिन्हा यांच्या हस्ते मंगळवारी पार पडले. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. कांबळे, सहव्यवस्थापक सुरेंद्र नेगी, राजू बजाज, शालिनी वॉरिअर, शाखा व्यवस्थापक सुरेंद्र सिंग उपस्थित होते. कारखाने, हॉटेल्स आदी १० कामगारांपेक्षा अधिक असलेल्या आणि २१ हजार रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कुठल्याही आस्थापनामधील कामगारांना www.esic.nic.in या वेबसाइटवर आपली नोंद करता येणार आहे. कारखान्यात काम करताना जखमी किंवा जायबंदी झाल्यास त्यांना पालघर जिल्ह्यातील सहा हॉस्पिटलमध्ये तर मुंबईतल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार करण्यात येणार आहेत.
विविध उपचारासाठी औषधालय
या विभागांतर्गत कामगारांचे विविध आजार, त्यांच्या मृत्यूच्या सर्व प्रस्तावाचे फायदे मिळत असताना त्यांना विविध उपचारासाठी औषधालयाची व्यवस्था येथे उपलब्ध करण्यात आली आहे. दोन तज्ज्ञ डॉक्टरसोबत नर्स, फार्मासिस्ट, विविध औषधेही उपलब्ध होणार आहेत. १० हजार रुपयांपर्यंत उपचाराचा खर्च भरून मिळणार असून त्यावरील खर्चाचा प्रस्ताव मुंबई कार्यालयात मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.